मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Third Eye Asian Film Festival: मराठी चित्रपटांचा डंका! ‘या’ दिवशीपासून होणार ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’

Third Eye Asian Film Festival: मराठी चित्रपटांचा डंका! ‘या’ दिवशीपासून होणार ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’

Jan 01, 2024 05:44 PM IST

Third Eye Asian Film Festival: यंदा ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’चे हे २०वे वर्ष असून, मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.

Third Eye Asian Film Festival
Third Eye Asian Film Festival

Third Eye Asian Film Festival: महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ पुन्हा एकदा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. यंदा ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’चे हे २०वे वर्ष असून, १२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात निवडलेले चित्रपट सिटीलाइट सिनेमा, माहिम आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये दाखवले जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’च्या या २०व्या वर्षी आशियाई स्पेक्ट्रम विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका येथील बारा चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. तर, इराणमधील सात चित्रपट ‘कंट्री फोकस’ या विभागात दाखवले जातील. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.

भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी, मराठी भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे. यात ‘फॅमिली’, ‘डीप फ्रीझ’, ‘बिजया पोरे’, ‘या गोष्टीला नावच नाही’, ‘आत्मपॅम्पलेट’, ‘हाऊस ऑफ कार्डस’, ‘एपिसोड १३’, ‘सेयुज सनधन’, ‘आरोह एक प्रितिभी’, ‘मिनी’, ‘विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर’, ‘गोराई पाखरी’ या १२ चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपट महोत्सवात यंदा मराठीचा देखील बोलबाला पाहायला मिळणार आहे.

Richa Chadha: विमान कंपनीवर भडकली अभिनेत्री ऋचा चढ्ढा! नेमकं झालं तरी काय? वाचा...

मराठी स्पर्धा विभागात जयंत सोमाळकर यांचा ‘स्थळ’, निलेश कुंजीर यांचा ‘रघुवीर’, केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’, संतोष कोल्हे यांचा ‘स ला ते स ला ना ते’, तानाजी गाडगे यांचा जित्राब, कविता दातीर, अमित सोनावणे दिग्दर्शित ‘गिरकी’, अनुप जत्राटकर यांचा ‘गाभ’, सचिन श्रीराम यांचा ‘टेरिटरी’, मंगेश बदार यांचा ‘मदार’ या ९ चित्रपटांचा समावेश थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग असणार आहे. यासोबतच कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच मान्यवर ज्युरी सदस्यांबरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी येत्या ५ जानेवारीपासून सुरू होणार असून, www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाईटवरून नोंदणी करता येणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४