मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आराम आणि रिलॅक्स असं काही नसतं… आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शाहरुख खानचा हा ‘मंत्र’ ऐकाच!

आराम आणि रिलॅक्स असं काही नसतं… आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शाहरुख खानचा हा ‘मंत्र’ ऐकाच!

Jun 15, 2024 01:08 PM IST

नुकताच शाहरुख खान याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र सांगताना दिसला आहे.

आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर, शाहरुख खानचा हा ‘मंत्र’ ऐकाच!
आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर, शाहरुख खानचा हा ‘मंत्र’ ऐकाच!

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान याने अतिशय मेहनतीने आणि स्वकष्टावर शून्यातून आपलं इतकं मोठं विश्व निर्माण केलं आहे. शाहरुखने आयुष्यात मोठं यश मिळवलं असलं तरी, त्याच्यासाठी हा यशाचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. त्याने आजवर अनेक कष्ट करून, वेळप्रसंगी अनेक ठेचा खाऊन आज हे आपलं स्वतःचं वेगळं आणि हक्काचं विश्व निर्माण केलं आहे. अनेकदा शाहरुख त्याच्या आयुष्याचा आणि या यशाचा कानमंत्र सांगताना दिसतो. नुकताच शाहरुख खान याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र सांगताना दिसला आहे.

या व्हिडीओमध्ये शाहरुख खान एका मुलाखतीत जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र चाहत्यांसोबत शेअर करताना दिसला आहे. २०१३मध्ये दिलेल्या एका मुलाखतीतील शाहरुख खानचा हा व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याच्या यशाचा मंत्र सांगताना म्हणाला की, ‘तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय असेल, तर काही गोष्टी सोडाव्या लागतील. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जेवण. चांगलं जेवण, रिलॅक्स असं काही नसतं. मोठ्या महागड्या स्पामध्ये जाऊन, तिथे जी ट्रीटमेंट दिली जाते, तसे आयुष्य मुळीच नसते. आरामशीर जीवन, सुट्टीच्या दिवशी आराम, डोळ्यांवर काकडी ठेवून केलेला आराम, असं काहीच नाही. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तर धावावं लागेल.’

ट्रेंडिंग न्यूज

आराम हराम आहे!

शाहरुख खान पुढे म्हणाला की, ‘तुम्हाला टेन्शन घ्यावे लागेल. भरपूर काम करावं लागेल. तुमचा रक्तदाब वाढवून घ्यावा लागेल. चांगलं जेवण मिळेल, त्याची अपेक्षा सोडावी लागेल. सगळ्यात आधी तर तुम्हाला झोप सोडावी लागेल. मी कामाच्या निमित्ताने फर्स्ट क्लासमधून प्रवास करतो. विमानाच्या फर्स्ट क्लासच्या कंपार्टमेंटमध्ये जी रेकलायनर सीट असते, मी तिला सरळ करून त्यावरही झोपत नाही. तुम्हाला जाग राहायचं आहे, शांत बसायचं नाहीये आणि सतत काही ना काहीतरी करायचे आहे, हाच यशस्वी होण्याचा हा एकमेव मंत्र आहे. आराम हराम आहे. जर, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्याग करता येत, नसेल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही.’

मीही अतिशय आळशी आहे! पण...

शाहरुख खान म्हणाला, ‘मी अतिशय आळशी आहे. मला व्हिडीओ गेम खेळायला आवडतो. मुलांबरोबर वेळ घालवायला आवडतो. मात्र मला माहितीये की, सकाळी उठून मला कामाला जायचं आहे. सिक्स पॅक बनवायचे आहेत. म्हणून मी जिममध्ये जाऊन घाम गाळतो. या सगळ्या गोष्टी मला आवडतात, असं नाही. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला वेदना होतील. पण यश थांबणार नाही. वेदना निघून जातील, पण तुम्हाला मिळालेलं यश तुमच्यापाशी तसंच राहील. आणि जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल की, अरे आराम करा, कामासाठी संपूर्ण आयुष्य पडलं आहे, तर नक्की... तुम्हाला यशस्वी व्हायचं नसेल तर तुम्ही याच मार्गावर चाला.’

WhatsApp channel