Pooja Bhatt Reaction On Viral Video: गेले काही दिवस मुंबईसह देशातील विविध भागांमध्ये गरब्याचा जल्लोष पाहायला मिळत होता. सगळीकडे गाण्यांच्या धूनवर तरुणाई थिरकताना दिसली. अगदी सगळ्या ठिकाणी तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला. असाच जल्लोष मेट्रोमध्ये देखील पाहायला मिळाला. मात्र, हीच गोष्ट पूजा भट्टला रुचलेली नाही. मुंबई मेट्रोमध्ये तरुणाईला गरब्याची गाणी आणि जय श्रीरामच्या घोषणा देताना पाहून पूजा भट्ट संतापली आहे. तिने एक व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, ‘या अशा गोष्टी सार्वजनिक ठिकाणी घडू नयेत.’
आता त्याच्या या पोस्टवर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. यातील काही जण पूजाला ट्रोल करत आहेत, तर काहींनी तिला पाठिंबाही दिला आहे.
सोशल मीडियावर एका व्यक्तीने व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'काही मुले-मुली मेट्रोमध्ये खाली बसून जोरजोराने गरब्याची गाणी आणि जय श्रीराम हे गाणे गात आहेत. हिंदू पॉप संगीत अशा प्रकारे बनवले जाते, जे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही स्तरांतील लोकांना सहज आकर्षित करते. उच्चवर्गीय तरुणांना मेट्रोत हे गाणे गाण्यास काहीच अडचण वाटत नाही. हिंदू-पॉप सगळीकडे आहे.'
पूजा भट्ट हिने हा व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, ‘सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करण्याची परवानगी कशी मिळाली? मग ते हिंदुत्वपॉप असो, ख्रिसमस कॅरोल असो, बॉलिवूड ब्लॉकबस्टर असो किंवा इतर काहीही असो. सार्वजनिक ठिकाणांचा अशा प्रकारे गैरवापर होता कामा नये.’
दुसऱ्या एक पोस्टमध्ये पूजा म्हणाली, ‘जर आपण मूलभूत नियमांचे पालन करू शकत नसाल, तर खऱ्या अर्थाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आशा नाही. सर्वच राजकीय पक्षांच्या बेकायदा होर्डिंग्समुळे शहर प्रदूषित होतेय, मेट्रोचे पार्टी झोनमध्ये रूपांतर होत आहे. काही लोकांकडून रस्त्याच्या मधोमध फटाके जाळले जात आहेत.’
पूजा भट्टच्या या पोस्टवर अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एकाने लिहिले की, ‘तुम्ही कधी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला आहे का? आपलं काम करा आणि इतरांना आपलं काम करू द्या. रस्ते, महामार्ग आणि रस्त्यांवर नमाज पठण करणारे मुसलमान तुमच्या डोळ्यांना का दिसत नाहीत? तुम्ही त्यांच्यासाठी का लिहिलं नाही कधी?’ काही लोकांनी या पूजाच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं की, ‘एकदा प्रवास केला की, त्यांच्यासोबत एन्जॉय ही कराल.’