Lampan Web Series In IFFI : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील वेब सीरिज सोबतच मराठी सीरिजही गाजताना दिसत आहेत.सोनी लिवच्या प्रतिष्ठित मराठी ओरिजिनल सीरिज 'लंपन'च्या शिरपेचात आता मनाचा तुरा रोवला गेला आहे.५५व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात इफ्फीमध्ये 'लंपन'ला 'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज'चा पुरस्कार मिळाला आहे.
प्रकाश नारायण संत यांच्या कालातीत कादंबरी 'वनवास'वर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये गीतांजली कुलकर्णी यांनी 'लंपन'ची आजी, चंद्रकांत कुलकर्णी यांनी 'लंपन'चे आजोबा, मिहिर गोडबोले याने 'लंपन'ची, तर कदंबरी कदम यांनी 'लंपन'ची आई आणि पुष्कराज चिरपुटकर यांनी 'लंपन'च्या बाबांची आणि अवनी भावे हिने 'सुमी' अशा प्रमुख भूमिका सकरल्या आहेत. या सीरिजची कथा आणि निर्मिती श्रीरंग गोडबोले, हृषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन आणि चिंतामणी वर्तक यांनी केली असून, दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांचे आहे.'लंपन' ही एक हृदयस्पर्शी कथा आहे जी, मैत्रीची आणि आत्मविश्वासाची प्रेरणा देणारी आहे.'लंपन'च्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना जीवनाच्या साध्या आनंदांची आणि प्रेमाच्या अमर शक्तीची आठवण करून दिली जाते.
या सीरिजचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले की,'५५व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला हा पुरस्कार प्रकाश नारायण संत यांच्या कादंबरीच्या कथेचे आणि आमच्या टीमच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रमाण आहे.'लंपन'मध्ये, आम्ही निष्पाप बालपण दाखवण्याचा प्रयत्न केला. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणे हे आमच्या विश्वासाला पुन्हा एकदा पुष्टी देणारे आहे. हृदयस्पर्शी कथांनी जागतिक स्तरावर आपला ठसा सोडला. मी हा मान सर्व कलाकार, क्रू आणि प्रेक्षकांना समर्पित करतो ज्यांनी आमच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला.'
'लंपन'च्या आजीची भूमिका साकरणाऱ्या गीतांजली कुलकर्णी यांनी म्हटले की,'लंपन केवळ एक शो नाही,तर तो प्रेम,आठवणी आणि अनुभवांची एक यात्रा आहे. या प्रकल्पाचा भाग होणे हा माझ्यासाठी खूप समाधानी अनुभव होता. या पुरस्कारामुळे मी संपूर्ण टीमसाठी अत्यंत आनंदी आहे आणि आम्हाला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे देखील आभारी आहे.'
"मोठं का व्हायचं?" या प्रश्नाचं उत्तर आजवर कुणालाही मिळालेलं नाही. याच प्रश्नाचं उत्तर शोधताना लंपनच्या मनात 'चक्रं' फिरू लागतात. ज्या वयात मुलाला आईच्या सहवासाची सर्वाधिक आवश्यकता असते, त्या वयात त्याला आजोळी जावं लागणं, हे एका लहान मुलासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण असतं. हीच भावनांची 'चक्रं' आणि एका लहान मुलाची मोठं होण्याची निरागस गोष्ट 'लंपन' या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रकाश नारायण संत यांच्या 'वनवासी' या कादंबरीतल्या लघुकथांवर आधारित असलेली ही सीरिज पाहणे, ऐकणे आणि अनुभवणे याची पर्वणी आहे. विशेषतः, ज्यांचं बालपण आई-बाबांपासून दूर आजी-आजोबांच्या सान्निध्यात गेलं, अशी मंडळी या सिरीजमधील प्रत्येक पात्राच्या भावनांशी सहजपणे जोडू शकतात.