मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ग्रामीण खलनायकाला स्वत:च्या खास खुमासदार शैलीने रंगवणारे एक श्रेष्ठ कलाकार म्हणजे अभिनेते निळू फुले. निळू फुले यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. 'नरम गरम', 'मशाल', 'वो ७ दिन दिन', 'कुली' यासारख्या हिंदी चित्रपटात अजरामर भूमिका केल्या. पण तुम्हाला माहिती आहे का कुली चित्रपटाच्या वेळी चक्क बॉलिवूडच्या अँग्री यंग मॅनला देखील निळूभाऊंनी ताटकळत ठेवण्याचा पराक्रम केला होता.
कूली हा अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील एक नावाजलेला चित्रपट. हा चित्रपट तयार होत असताना अनेक अडचणी येत होत्या. शूटिंग दरम्यान अमिताभ यांना अभिनेता पुनीत ईसार यांच्याकडून गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे अमिताभ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास २०० रक्तदात्यांनी ६० रक्ताच्या बाटल्या अमिताभ यांच्यासाठी दिल्या होत्या. अमिताभ लवकरच यातून बरे झाले. पण दरम्यानच्या काळात शूटिंग थांबवावी लागली.
अमिताभ जखमी होण्याअगोदर निळू फुले आणि अमिताभ यांनी काही सिन शूट केले होते. अमिताभ जखमी झाल्यानंतर निळू फुले नवीन नाटके आणि चित्रपटाच्या कामात व्यस्त झाले. निळू फुलेंना चित्रपटाची शूटिंग कधी पुन्हा कधी सुरु होईल याची काही कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांना नवीन नाटकांच्या तालमीला सुरवात केली. प्रसिद्ध नाटककार आत्माराव सावंत हे निळू फुलेंना घेऊन ‘राजकारण गेलं चुलीत’ हे नवीन नाटक तयार करत होते.
‘राजकारण गेलं चुलीत’ या नाटकाचे प्रयोग चालू झाले. निळू फुलेंनी अगोदरच तारखा दिल्या होत्या. किमान दहा दिवस आधी नाटकाच्या तारखा जाहीर होतात. त्यामुळे निळू फुले हे बांधील होते. त्यावेळेस राजकारण गेलं चुलीत हे नाटक जोरात सुरु होते. जवळपास या नाटकाचे १२०० प्रयोग झाले होते. या नाटकाचा पुढचा प्रयोग संगमनेरला होणार होता. त्याच वेळेस निळू फुलेंना निरोप आला की कूली चित्रपटाचे शूटिंग पुन्हा चालू झाले आहे. अमिताभ आणि निळू फुले यांचे मिळून काही सीन्स शूट करण्यासाठी निळू फुलेंना तारीख सांगितली गेली. निळू फुले हे मोठया कात्रीत सापडले. अगोदरच त्यांनी तारखा दिल्या होत्या. मध्येच ‘कूली’ साठी चालू नाटकाचे प्रयोग थांबवणे शक्य नाही. कोणत्याही नाटकावर एखादा निर्माता जेव्हा पैसा लावतो तेव्हा इतर कलाकारांची जबाबदारी असते कि निर्मात्यांचे नुकसान होता कामा नये.
निळू फुलेंच्या विश्वासावर निर्मात्याने पैसे लावले होते. त्यामुळे मोठे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी कूलीच्या निर्मात्यांना आता लगेच शक्य नसल्याचं कळवलं. अमिताभ यांच्या तारखा ठरवल्या होत्या. सगळी तयारी झाली होती. त्यांच्यावर पण नुकसानीची वेळ येणार होती. निळू फुले त्यांच्या जागेवर बरोबर होते. एकूणच नाईलाज होता. पण यामुळे निळू भाऊंना मात्र कायमचे नुकसान झाले.
वाचा: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले सत्य, वाचा…
नाटकाच्या प्रयोगानंतर कूलीच्या निर्मात्यांनी निळू फुले आणि अमिताभ बच्चन यांच्या तारखा जुळवून आणल्या. राहिलेले कूलीच शूटिंग पूर्ण झाले. त्या काळी अमिताभ बच्चन जरी हिंदी सिनेसृष्टीला अँग्री यंग मॅन म्हणून नावाजलेले असले तरी निळू फुले देखील मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरचे महानायक होते. मात्र एका सहकालाराने नाटकासाठी चक्क अमिताभ सारख्या कलाकाराला ताटकळत ठेवण्याची ही इतिहासातली पहिली आणि शेवटची घटना असेल.