The Other World Natak : 'द... अदर वर्ल्ड' हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी,नाले,ओढे, झरे,समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.
"द... अदर वर्ल्ड" हे मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक जे मानवी अस्तित्व, निसर्ग आणि पंचतत्त्वांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकते. हे नाटक पारंपरिक कथाकथनापलीकडे जाऊन, प्रेक्षकांना या अनुभवात सहभागी करून घेतं. नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. आदी मानव ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमात्तेच्या जगातील आजच्या मानवापर्यंत नाटक प्रेक्षकांना प्रवास करवते. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील असमतोल, आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान, तसेच आपल्या जगाची सद्यस्थिती या सर्व बाबींची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरते. हे नाटक केवळ गोष्ट सांगणारी कलाकृती नसून, ती आपल्याला अंतर्मुख करते. आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत, त्याच्याशी आपले नाते काय आहे? आपण पुढील पिढ्यांसाठी कोणती दुनिया तयार करत आहोत? या मूलभूत प्रश्नांवर नाटक भाष्य करते.आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते.
मंजुळ भारद्वाज यांच्या दिग्दर्शनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे ते नाटकाला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत मर्यादित ठेवत नाहीत, तर ते प्रेक्षकांना विचार करायला लावतात. नाटकात रंगमंचाचा वापर अत्यंत कल्पकतेने केला आहे. प्रकाशयोजना, नैसर्गिक ध्वनी निर्मित संगीत आणि सकस अभिनय या सर्व घटकांचा प्रभावी संगम पाहायला मिळतो.
नाटकात संवादांपेक्षा दृश्यात्मक संकल्पनांना अधिक महत्त्व दिलेले आहे. कलाकारांचे शरीराभिनय, नैसर्गिक शरीराच्या सर्वच अवयवांची हालचालींचा अत्यंत प्रभावीपणे केलेला वापर, अभिनय कौशल्य आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना हा एक अविस्मरणीय वेगळा अनुभव मिळतो.
कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये अत्यंत ताकदीने प्राण ओतले आहेत. नाटकात कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे प्रांजल, समर, प्राणम्य या कलाकारांनी उत्तम अभिनयची कला सादर केली आहे. विशेषतः पंचतत्त्वांचे सादरीकरण करताना त्यांनी आपल्या देहबोलीद्वारे आणि हावभावांद्वारे या संकल्पनांना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले आहे.स्वच्छ आणि तरल अभिनय करण्यासाठी कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली आहे. यात सादर केलेला प्रत्येक संवाद कलाकार प्रत्यक्ष आदिवासी पाड्यात जाऊन राहून प्रत्यक्ष जगले आहेत, म्हणूनच त्यांच्या अभिनयातून वास्तविक परिस्तिथीचे दृश्य प्रेक्षकांपर्यंत परिणामकरकपणे पोहचवण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत. संवादांची संख्या मर्यादित असली, तरीही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संवादांची कमतरता भासत नाही. त्यांच्या वेशभूषा, संवादफेक, आणि शरीरभाषा यामुळे संपूर्ण नाटकाचा परिणाम अधिक परिणामकारक वाटतो.
या नाटकात वापरलेले पार्श्वसंगीत हे पारंपरिक वाद्यातून आणि अभिनेत्यांनी स्वतःच्या तोंडातून निर्माण केलेल्या ध्वनीतून, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज, किलबिलाट, हवेचा आणि पाण्याचा ध्वनी फारच परिणाम करून गेला आणि कलाकारांनी आवश्यकतेनुसार निर्माण केलेले ध्वनी परिणाम वातावरणनिर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्रसंगी अभिनय,ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने निर्माण होणारे दृश्य प्रभाव प्रेक्षकांना खरोखरच दुसऱ्या जगात घेऊन जातात.
"द... अदर वर्ल्ड" हे केवळ रंगभूमीवरील प्रयोग नाही, तर हा एक अनुभव आहे. नाटकानंतर प्रेक्षक आपल्या भोवतालचा, पर्यावरणाचा आणि मानवी अस्तित्वाच्या नैतिकतेचा पुनर्विचार करू लागतात. माणूस जोडून वैचारिक रित्या एकत्र करून माणुसकीला वाचवण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून यश येत आहे. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने कलाकार आणि प्रेक्षकांच्या संवादाच्या माध्यमातून माणूस जोडला जातो आहे. आत्म विकास करण्यासाठी सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण झाली. ते केवळ एक कथा सांगत नाही, तर आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून कृती करण्यास उद्युक्त करते.
- प्रवीण गांगुर्डे
संबंधित बातम्या