नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा कॉमेडी शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. यावेळी कपिल शर्मा आपला हा शो टीव्हीऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर घेऊन आल्यामुळे आधीच चर्चेत आला होता. या शोच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर कपिल आणि सुनील ग्रोव्हरची कॉमेडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळत आहे. या शोचा पहिला सीझन मार्चमध्ये रणबीर कपूर, त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांच्यासोबत सुरू झाला होता. यानंतर अनेक स्टार्सनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान, हा शो बंद होणार असल्याच्या बातम्या यापूर्वी चर्चेत आल्या होत्या. पण आता या सगळ्या अफवांच्या दरम्यान अखेर सुनील ग्रोव्हरने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा पहिला सीझन खूप मजेदार होता, पण आता तो लवकरच संपणार आहे. कपिलच्या शोचा पहिला सीझन या महिन्यात २२ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे कपिलचा शो पुन्हा पाहण्याची संधी मिळणार नाही की, नाही या विचाराने प्रेक्षकांची निराशा झाली होती. पण, यादरम्यान सुनील ग्रोव्हरने चाहत्यांना खूश करण्यासाठी बातमी दिली आहे. सुनील ग्रोव्हरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे, त्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
अभिनेता सुनील ग्रोव्हरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत पहिला सीझन बंद झाल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे दुसरा सीझन सुरू झाल्याची बातमी देत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. या व्हिडीओमध्ये कपिलने पहिल्यांदा शो बंद झाल्याबद्दल सांगत असतो, तेव्हा अर्चना पूरण सिंह, कृष्णा अभिषेक सह इतर कलाकारांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. पण त्याने दुसऱ्या सीझनची घोषणा करताच सर्वजण आनंदाने उड्या मारतात.
कपिल म्हणाला, 'नेटफ्लिक्सवर पुढच्या सीझनमध्ये लवकरच भेटू'.' हा व्हिडीओ शेअर करत सुनीलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मनोरंजनाचा पाऊस पुन्हा पडणार आहे, कारण 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन २ अवघ्या काही महिन्यांत येणार आहे'. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.