Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टीव्हीची सर्वात लोकप्रिय सिटकॉमपैकी एक 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या एका वर्षात अनेक वेळा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांना अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी वादात ओढले आहे. नुकताच पलक सिधवानीनेही शो सोडला आणि निर्मात्यावर धक्कादायक आरोप केले. आता अखेर असित मोदी यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच खुलेपणाने आपले मत मांडले आहे.
एका प्रसिद्ध वृत्त संस्थेशी बोलताना असित मोदी म्हणाले की, 'मी पलक सिधवानीला आपली मुलगी मानतो. पलकच्या शो सोडून जाण्याने मला खूप दु:ख झाले आहे. कारण मी तिला मुलीप्रमाणे मानतो आणि नेहमीच तिची काळजी घेतली आहे आणि पुढेही तिच्याबद्दल असाच विचार करत राहीन.' सोनूची भूमिका साकारणाऱ्या सिधवानीवर झालेल्या कायदेशीर कारवाईबद्दल बोलताना असित मोदी म्हणाले की, ‘सध्या सुरू असलेल्या पलक प्रकरणाचा संबंध आहे, तोपर्यंत हे प्रकरण कायदेशीररित्या हाताळले जात आहे आणि तसेच पुढेही हाताळले जाईल. सेटवर आपल्याला सगळ्यांनाच शिस्त पाळावी लागते. जर तुम्ही आधीच एखाद्या संस्थेत काम करत असाल तर तुम्हाला इतर ठिकाणी काम करण्याची परवानगी मिळेल का? नाही ना?, बरोबर? त्याचप्रमाणे, आमचे काही नियम आहेत. कारण आम्हाला दर महिन्याला २६ एपिसोड शूट करावे लागतात.’
शैलेश लोढा आणि जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्यासह 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या अनेक अभिनेत्यांनी शो निर्मात्यांवर त्यांची थकबाकी न देण्याचा, वैयक्तिक आणीबाणीसाठीही रजा नाकारल्याचा आणि कामासाठी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्या म्हणण्यानुसार, सर्व कलाकारांना वैयक्तिक रजा देण्यात आली होती. कारण असित मोदी म्हणाले की, मला स्वतःला असं वाटतं की, प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत पुरेसा वेळ घालवला पाहिजे.' त्यांनी म्हटले की, जेव्हा जेव्हा आमच्या कलाकारांपैकी कोणाला रजा घ्यायची होती, तेव्हा त्यांना वेळोवेळी रजा दिली जात होती. परंतु, त्यांना त्यांच्या सुट्टीपूर्वी काही तास काम करावे लागत होते. कोणत्याही अभिनेत्याने पेमेंटबाबत कोणताही मुद्दा उपस्थित केलेला नाही, असेही मोदींनी निदर्शनास आणून दिले.