उघडणार स्वर्गाचे दार, अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! ‘झी नाट्यगौरव २०२५’चा दिमाखदार सोहळा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  उघडणार स्वर्गाचे दार, अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! ‘झी नाट्यगौरव २०२५’चा दिमाखदार सोहळा

उघडणार स्वर्गाचे दार, अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार! ‘झी नाट्यगौरव २०२५’चा दिमाखदार सोहळा

HT Marathi Desk HT Marathi
Published Mar 28, 2025 04:06 PM IST

‘अतुल तोडणकर’ आणि ‘अद्वैत दादरकर’ उघडले स्वर्गाचे दारच्या प्रवेशातून अतुल परचुरे ह्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

Zee Natya Gaurav 2025
Zee Natya Gaurav 2025

यंदाचा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’ सोहळा हा खूप अविस्मरणीय असणार आहे. याचसोबत ह्या सोहळ्यात अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरवच्या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळणार आहेत. ‘अतुल तोडणकर’ आणि ‘अद्वैत दादरकर’ उघडले स्वर्गाचे दारच्या प्रवेशातून अतुल परचुरे ह्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. ह्या भावुक क्षणात अनेकांचे डोळे पाणावणार आहेत. तसेच ह्यावर्षीचे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आहेत, प्रकाश बुद्धीसागर यांना मिळणार आहे.

मराठी रंगभूमीची आयुष्यभर सेवा करणारी अनेक नाटकवेडी माणसं आपण पाहिली असतील. पण मराठी रंगभूमी हेच ज्यांचं आयुष्य आहे असे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि रंगकर्मी म्हणजे ‘प्रकाश बुद्धीसागर’. त्यांच्या बोलण्यातून गेली कित्येक दशकांच्या नांदीचा स्वर दरवळतो. तर त्यांच्या नुसत्या उपस्थितीने देखील नाट्यगृह अगदी धुपासारखं भरून जातं. त्याच्या अनुभवसंपन्न दिग्दर्शनातून मराठी रंगभूमीचा अलवाणी पडदा अधिकाधिक गडद होत जातो तर तालमीत घडलेला कलाकार मोठ्या खुबीने रंगावकाशात स्वतःचं नवं स्थान निर्माण करतो.

एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांच्या दिग्दर्शनापासून ते अनेक लोकप्रिय व्यावसायिक नाटकांच्या दिग्दर्शनापर्यंतचा त्यांचा हा प्रवास ह्या क्षेत्रात नव्याने काहीतरी करू पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रेरणा देणारा असाच आहे. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रकाशजींनी केवळ पहिला नाहीत तर तितक्याच जवळून अनुभवला. त्या काळी नाटकांच्या जाहिरातींवरील कलाकारांच्या यादीपेक्षा, दिग्दर्शक म्हणून त्यांच नाव वाचून प्रेक्षक नाटकांना गर्दी करत असत. एकाच वेळी मुंबईच्या सातही प्रमुख नाट्यगृहांत अगदी कोणतंही नाटक बघायला जावं तर ते नाटक प्रकाश बुद्धीसागर यांनीच दिग्दर्शित केलेलं असायचं.

शांतेचं कार्ट चालू आहे, आईशप्पथ, भ्रमाचा भोपळा, ब्रह्मचारी, एक हट्टी मुलगी, वटवट सावित्री यांसारखी दिग्दर्शित केलेली, काही निखळ विनोदाने भरलेली, तर काही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारी नाटकं मराठी प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरली आणि मनोरंजनाबरोबरच व्यावसायिक दृष्ट्याही ही नाटकं यशस्वी करून दाखवून मराठी नाट्य सृष्टीत दिग्दर्शक म्हणून आपलं नाव अदबीनं घ्यायला आपण भाग पाडलंत.

परंतु प्रकाशजींच्या कारकिर्दीचा प्रयोग भर रंगात असताना एकाएकी दुर्दैवी मध्यंतर झाला आणि पुढचा अंकच अंधुक दिसायला लागला. एकामागून एक आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्यांनी शारीरिकदृष्ट्या गंभीरपणे खचून गेलात. अशातच आपल्या जवळच्या काही लोकांनी आपली साथ सोडली, तर काहींनी ह्याच परिस्थितीचा फायदा उचलत आपली फसवणूक देखील केली. परंतु तरीही आपण नाउमेद झाला नाहीत.

अंधार कितीही दाट असला तरी पुढच्या प्रवेशासाठी वाट काढत पुन्हा प्रकाशझोतात येण्याची शिकवण ही रंगभूमीच आपल्याला नकळत देत असते. त्याचप्रमाणे ह्या गंभीर आजारातून सावरलात आणि पुन्हा एकदा रंगभूमीच्या सेवेत रुजू झालात. ह्या काळात दिग्दर्शनापासून आपण थोडे लांब असलात तरी अशा परिस्थितीतही आपण ' गौना अभी बाकी है' नावाचं नाटक लिहून काढलंत. हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी साऱ्याच रसिकांना आशा आहे.

प्रकाश बुद्धीसागर यांनी खरोखरच एखाद्या व्रतस्थाप्रमाणे संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी झोकून दिलं. असं म्हणतात, जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये, पण आपण नाटकासाठी आणि नाटकावरच्या आपल्या प्रेमासाठी सारं काही उदार मनाने आणि निस्वार्थपणे दिलंत. आपलं देणं ह्या जन्मात तरी फेडणं शक्य नाही. तरी केवळ आणि केवळ पुरस्कारांनी भरलेल्या आपल्या घराच्या भिंतींवर आणखीन एका मानाच्या पुरस्काराची भर घालण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न.

‘झी नाट्य गौरव २०२५’ जीवनगौरव पुरस्काराचे दुसरे मानकर ठरले लेखक, दिग्दर्शक, परीक्षक, समीक्षक पुरुषोत्तम बेर्डे. काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरचा एक अवलिया मनोरंजनाची एक भन्नाट टूर घेऊन निघाला जो आजवर कधी थांबलाच नाही. अनेक कलाकार, नाटकं, पुस्तकं, चित्रपट, जाहिराती ह्या टूरमध्ये सामील झाले आणि प्रवास अधिकाधिक संपन्न होत गेला. लेखक, दिग्दर्शक, परीक्षक, समीक्षक अशा अनेक भूमिकांमधून हा संपूर्ण गाडा मोठ्या कल्पकतेने पुढे नेणारे अष्टपैलू कलाकार म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे.

' या मंडळी सादर करूया ' ह्या त्यांच्या नाट्यसंस्थेच्या अनोख्या नावाइतक्याच आपल्या कलाकृती देखील अत्यंत कल्पक असायच्या. नाटकाची प्रयोगशीलता जपत सर्वसामान्यांना रुचेल आणि समजेल असा आशय हे आपल्या नाटकांचं बलस्थान आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी जाहिरात क्षेत्रात चुरचुरीत भाषाशैली, चित्रकराचा अनोखा दृष्टिकोन आणि तितक्याच माहितीपूर्ण कोट्या करण्याचं कौशल्य ह्या साऱ्या भांडवलाच्या जोरावर प्रचंड यश मिळवल. पण तरीही त्यांच्यातल्या दिग्दर्शकाला नाट्यक्षेत्र खुणावू लागलं आणि १९८३ साली त्यांनीच लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं 'टूरटूर' हे चिरतरूण नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं. पुरुषोत्तम बेर्डेच्या ह्या पहिल्याच नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, सुधीर जोशी, विजय कदम, विजय चव्हाण, विजय केंकरे, चेतन दळवी, दीपक शिर्के हे सारेच कलाकार पुढे जाऊन रंगभूमीचे सम्राट बनले.

त्यानंतर ' गांधी विरुद्ध सावरकर ' , ' जाऊ बाई जोरात ', ' खंडोबाचं लगीन ', ' चिरीमिरी ' पासून ते ' मुक्काम पोस्ट आडगाव ' पर्यंत सर्वच नाटकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. नाटकांबरोबरच ' निशाणी डावा अंगठा ' , ' शेम टू शेम,' ' हमाल दे धमाल ', ' जमलं हो जमलं ' यांसारख्या अनेक चित्रपटांनी देखील प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणलं. ह्या साऱ्या व्यापातून वेळ काढून त्यांनी 'हिरवी पोट्रेट्स' आणि 'क्लोज एन्काउंटर' सारख्या पुस्तकांच्या माध्यमातून आपली लेखणी सतत लिहिती ठेवलीत. कलाक्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या कलाकारांसाठी ते कधी मार्गदर्शक झाले, तर कधी विविध नाट्यस्पर्धांचे परीक्षक. कधी मित्र म्हणून, तर कधी मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेकांना बरोबर घेऊन ह्या नाट्यसृष्टीची पाऊलवाट अधिकाधिक विस्तारत ठेवली.

Whats_app_banner