Tharla Tar Mag Latest Episode 4 September 2023: ‘ठरलं तर मग’ ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांची आवडती बनली आहे. काहीच दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या या मालिकेने आता मोठा प्रेक्षकवर्ग जमवला आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना आणखी रंजक कथानक पाहायला मिळणार आहे. सायली नावाच्या अनाथ मुलीची ही कथा आता एका वेगळ्याच वळणार येणून पोहोचली आहे. आता लवकरच सायलीच्या जन्माचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. सध्या सुभेदारांच्या घरात नव्या सुनेचा पहिलाच मंगळागौर सण रंगला आहे.
अर्जुन आणि सायली यांनी एका विचित्र प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी दिखाव्याचं लग्न केलं असलं, तरी दोघेही आपापल्या जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. एकीकडे अर्जुन मधुभाऊंना खोट्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी त्याचे शक्य ते सगळे प्रयत्न पणाला लावत आहे. तर, दुसरीकडे अर्जुनसोबत लग्न करून सुभेदारांची सून झालेली सायली आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि मनमिळावू वृत्तीने सगळ्यांची मनं सांभाळत आहेत. सुरुवातीला सायलीचा दुस्वास करणारे सगळेच लोक आता तिला सून म्हणून स्वीकारून, तिचे कोडकौतुक करत आहेत.
आता अर्जुन आणि सायली यांच्या लग्नानंतर पहिलाच मंगळागौर सण साजरा करणार आहेत. यावेळी सायलीला शक्य तेव्हढा त्रास देण्याचा प्रयत्न तन्वी करणार आहे. या मंगळागौरीच्या खेळात बस फुगडी खेळताना तन्वीला सायलीच्या तळपायावरची जन्म खुण दिसते. आता हिच जन्म खुण पूर्णा आज्जीला किंवा सुभेदारांच्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीला दिसली, तर त्यांना आपण तन्वी नसल्याचं सत्य कळेल. इतकचं नाही तर, सायली हीच खरी तन्वी असल्याचं देखील सगळ्यांसमोर येईल, याची धास्ती वाटत आहे. यामुळे ती आता सायलीला त्रास देण्याचा प्लॅन रद्द करणार आहे.
मात्र, यावेळी ही गोष्ट तन्वीच्या लक्षात आली असली, तरी ती आपल्या साथीदारांना हे सांगू शकणार नाहीये. त्यामुळे आता सायलीला त्रास देण्याचा प्लॅन सुरूच राहणार आहे. यावेळी मंगळागौर सुरू असताना फरशीवर तेल सांडून सायलीला दुखापत व्हावी यासाठी तिची नणंद नवा डाव आखणार आहे. मात्र, जर सायली खाली पडली आणि तिच्या पायावरची जन्म खुण सगळ्यांनी पाहिली तर आपलं बिंग फुटेल, अशी भीती देखील तन्वीला वाटत आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे मनोरंजक कथानक पाहायला मिळणार आहे.