टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावणारी सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग.' या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पण जुईची प्रकृती ही गेल्या काही महिन्यांपासून ठीक नसल्याचे समोर आले होते. आता जुईने शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली आहे. तिने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
जुई ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. जुईने तिच्या तब्येतीबाबत काही दिवसांपूर्वी अपडेट दिली होती. जुई सध्या आजारी असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समोर आले होते. या फोटोमध्ये जुईच्या हाताला आयव्ही लावलेली दिसत होती. आता जुईला नेमकं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला होता. स्वत: जुईने शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली आहे.
सेटवरील ऍक्शन मोड असलेला फोटो स्टोरीला पोस्ट करत तिने कामाला सुरुवात केली असल्याचं सांगितलं. यानंतर अभिनेत्रीने एक सेल्फी व्हिडीओही शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती हॉस्पिटलमधील रुग्णाच्या कपड्यांमध्ये दिसते आहे. मालिकेत सायलीचा अपघात झाल्याचे दाखवले आहे, त्यामुळे त्यानंतरचे शूटिंग ती हॉस्पिटलमध्ये करताना दिसत आहे.
जुईने व्हिडीओ शेअर करत, “तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. हो, मी फुल्ल पॉवरने सेटवर परतले आहे”. या व्हिडीओमध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेचे शीर्षकगीतही ऐकू येत आहे. अभिनेत्रीने म्हटले की सेटवरील भावुक सीनदरम्यान मालिकेचे शीर्षकगीत वाजवण्यात आले होते. यानंतर जुईने एक फोटो शेअर करत स्टोरी पोस्ट केली आहे आणि या स्टोरीखाली “अफवांवर विश्वास ठेवू नका. शुटिंग वगैरे थांबलंय असं खोटं सांगू नका. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि लवकरच त्याबद्दल पोस्ट करेन. तोपर्यंत धीर धरा आणि प्रेम करत रहा” असे म्हटले आहे.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत असून तिची ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे, आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.