Tharala Tar Mag latest Update: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली आणि अर्जुन आता हनिमूनसाठी जाणार आहे. मालिकेचा हनिमून स्पेशल भाग माथेरानमध्ये शूट करण्यात आला आहे. या शूटचा खास व्हिडीओ निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सायली आणि अर्जुनमधील काही खास रोमँटिक क्षण पाहायला मिळाले आहेत. लवकरच ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा हनिमून स्पेशल भाग प्रेक्षकांना देखील पाहायला मिळणार आहे. या भागाचे शूटिंग करताना सायली आणि अर्जुन यांनी भरपूर धमाल केली आहे. या व्हिडीओमध्ये दोघांची धमाल देखील पाहायला मिळाली आहे.
कल्पना सुभेदार यांच्या हट्टामुळे आता अर्जुन आणि सायलीला हनिमूनला जावंच लागणार आहे. रुसून माहेरी निघून गेलेल्या सायलीला पुन्हा एकदा घरी घेऊन येण्यात अर्जुन यशस्वी ठरला आहे. यामुळेच आता घरातील सगळीच मंडळी अर्जुनवर खूप खुश आहेत. दुसरीकडे, सायलीच्या सासूबाई म्हणजेच कल्पना सुभेदार यांनी आपल्या लाडक्या सुनेला आणि मुलाला म्हणजेच सायली आणि अर्जुन यांना खास सरप्राईज दिले आहे. त्यांनी दोघांना हनिमूनच्या तिकिट्स दिल्या आहेत. लग्नानंतर सतत आलेल्या काहीना काही कामांमुळे सायली आणि अर्जुन यांना एकमेकांना वेळच देता आलेला नाही, असे त्यांना वाटत आहे.
त्यामुळे त्यांनी सायली आणि अर्जुन यांना हनिमूनसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आईच्या हट्टापुढे अर्जुन आणि सायलीला देखील माघार घ्यावी लागली आहे. अनेक कारणं दिल्यानंतर देखील आई ऐकत नसल्याने आता सायली आणि अर्जुन अखेर हनिमूनसाठी रवाना होणार आहे. माथेरानच्या गुलाबी थंडीत आता ते आपल्या आयुष्यातील काही खास क्षण अनुभवणार आहेत. त्यांचं लग्न जरी खरं नसलं तरी त्यांच्या आयुष्यातील एकमेकांची साथ ही मनापासून दिलेली आहे. लग्नाचा जरी करार करण्यात आला असला तरी, अर्जुन सायलीच्या प्रेमात पडला आहे. सायलीला देखील मनातून अर्जुन आवडू लागला आहे.
मात्र, दोघांमधील करारानुसार आता त्यांच्या लग्नाचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे आता सायली अर्जुनपासून दूर आपल्या घरी निघून जाणार आहे. त्यांचा संसार आता संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, आता हा रोमँटिक हनिमून दोघांच्या आयुष्यात काहीतरी खास वळण घेऊन येण्याची शक्यता आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये दोघांचा रोमान्स बघायला मिळणार आहे.