मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘ठरलं तर मग’च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला भन्नाट किस्सा

‘ठरलं तर मग’च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला भन्नाट किस्सा

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 01, 2024 01:27 PM IST

सध्या छोट्या पडद्यावर ‘ठरलं तर मग’ ही मालिका धुमाकूळ घालत आहे. गेले अनेक आठवडे टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतले आहे.

‘ठरलं तर मग’च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला भन्नाट किस्सा
‘ठरलं तर मग’च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला भन्नाट किस्सा

सध्या मालिकांची चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ आहे. अनेक मालिकांना चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. यातच ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. सध्या छोट्या पडद्यावर ‘ठरलं तर मग’ ही मालिका धुमाकूळ घालत आहे. गेले अनेक आठवडे टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतले आहे. केवळ मालिकेची कथाच नाही, तर या मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. सध्या या मालिकेची चांगली चर्चा होताना पाहायला मिळतेय. चाहते देखील या मालिकेबद्दल भरभरून बोलताना आणि लिहिताना दिसतात.

ट्रेंडिंग न्यूज

अशातच ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील एका अभिनेत्याने एक भन्नाट किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या एका चाहत्याने त्याच्या घरातील मांजराच्या पिल्लांना चक्क मालिकेतील पात्रांची नावे दिली आहेत. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत चैतन्य साकारणाऱ्या अभिनेत्याला या चाहत्याने मेसेज करत आपल्या मांजराच्या पिल्लांची नावे सांगितली. तसेच, ही नावं तुमच्या मालिकेच्या पात्रांवरून ठेवली असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिला मांजरांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे चैतन्यने हा मेसेज जुईला देखील दाखवला.

डेस्कवर विसरलेलं समान मागण्यासाठी फोन केला अन् प्रेमात पडला! ‘बर्थडे बॉय’ पुष्कर श्रोत्रीची लव्हस्टोरी वाचाच...

अन् आईने पिल्लांना दिली मालिकेतील नावं!

त्यानंतर जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर याचा स्क्रीन शॉट देखील शेअर केला. चाहत्याच्या या मेसेजमध्ये त्याने असं म्हटलंय की, ‘काल रात्री आमच्या घरी काहीतरी मजेशीर घडलं आणि मी ते तुम्हाला सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीये. शकूने म्हणजे आमच्या मांजरीनं पुन्हा चार लहान पिल्लांना जन्म दिला. पण, त्यावेळी माझी आई तुमच्या मालिकेत गुंतलेली होती. म्हणून तिने त्या मांजराच्या पिल्लांची नावे अर्जुन, सायली, साक्षी आणि चैतन्य अशी ठेवली आहेत. याचा आम्हाला किती आनंद झाला याची तुम्हाला कल्पना देखील नाही.’

कलाकारांनीही केलं कौतुक!

चाहत्याने पुढे लिहिले की, ‘अर्थात आम्ही आईच्या या निर्णयाच्या विरोधात आहोत. पण आईच्या पुढे कुणाचं काय चालणार ना... आम्ही आईच्या या नावांना विरोध केला. मात्र, आईने त्या पिलांना सायली, अर्जुन, साक्षी आणि चैतन्य म्हणायला सुरुवात देखील केली आहे.’ चाहत्याच्या या मेसेजला उत्तर देताना चैतन्यने म्हटलं की, ‘तुमच्या घरातील या चिमुकल्या पिल्लांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि प्रेम.’ तर सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने देखील प्रतिक्रिया देत, ‘किती भारी आता पिल्लांची नावेसुद्धा अर्जुन, सायली, साक्षी आणि चैतन्य असणार..’ असं म्हटलं आहे. मात्र, यातून प्रेक्षकांचे प्रेम दिसून येते, असे या मालिकेचे कलाकार म्हणत आहेत.

IPL_Entry_Point