Know about Jui Gadkari Personal life: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. तिची कल्याणी ही भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेनंतर जुईने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जुईने जेव्हा इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला तेव्हा तिचा खासगी आयुष्यात मोठा संघर्ष सुरु होता. ती एका गंभीर आजाराने त्रस्त होती.
जुईने 'लोकमत फिल्मी'ला नुकताच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, तिने आजाराविषयी देखील वक्तव्य केले. "मी आई होऊ शकणार नाही हे डॉक्टरांनी मला वयाच्या २७ व्या वर्षी सांगितले होते. डॉक्टरांनी मला जेव्हा हे सांगितले तेव्हा मी 'पुढचं पाऊल' ही मालिका करत होते. मालिकेत तेव्हा कल्याणीला बाळ होणार असल्याचा ट्रॅक सुरू होता. त्यावेळी एकीकडे खऱ्या आयुष्यात मला बाळ होणार नाही आणि दुसरीकडे मालिकेत मला एका आईची भूमिका साकारायची होती. ते दिवस माझ्यासाठी खूप त्रासदायक होते" असे जुई म्हणाली.
वाचा: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल
पुढे ती म्हणाली, "मानसिकदृष्ट्या मी खचले होते. मणका डिजनरेट झाला होता. पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्युमर झाला होता. त्यामुळे मी आई होऊ शकत नाही, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. सुरुवातीला फक्त डोके दुखायचे, पुढे वजन वाढले. मासिक पाळीत अडचणी येऊ लागल्या. आपल्या समाजात स्त्रीला मुलबाळ झाल्यावरच ती पूर्ण होते असा समज आहे. पण ज्या महिलांना बाळ होऊ शकत नाही त्यांनी काय करायचे? त्या स्त्रिया नाहीत का? तिच्यात मातृत्व नाही का? मला आज अनेक लोक म्हणतात वयाची ३५ वर्षे पार केलीस आता कधी लग्न करणार? पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. या सगळ्यात माझे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत." हे सर्व बोलत असताना जुई थोडी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
वाचा: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा
जुईच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. यापूर्वी ती पुढचं पाऊल या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील कल्याणी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली.
संबंधित बातम्या