‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. या मालिकेत जुई ‘सायली सुभेदार’ हे पात्र साकारत असून, या पात्रानं प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, नेहमीच काही ना काही धमाल गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लगीन घाई पाहायला मिळत आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत सार्थक आणि आनंदी पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार आहेत. एकमेकांच्या प्रेमात पडलेले सार्थक आणि आनंदी आता कुटुंबांच्या परवानगीने धुमधडाक्यात लग्न करणार आहे.
या लग्न सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. तर, या लग्न सोहळ्यात इतर मालिकेतील जोड्या देखील सहभागी होणार आहेत. याच निमित्ताने जुई गडकरी हिने एक किस्सा शेअर केला आहे. एका वेबपोर्टला दिलेल्या मुलाखतीत सायली आणि अर्जुनला भन्नाट प्रश्न विचारण्यात आले. ‘तुम्हाला लग्नाच्या पंगतीमध्ये जेवायला आवडेल की लोकांना जेवण वाढायला आवडेल?’ असा प्रश्न या दोघांना विचारण्यात आला होता. यावेळी सायलीने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच हसू येणार आहे.
जेवायला वाढायला आवडेल की, जेवायला आवडेल या प्रश्नावर उत्तर देताना सायली म्हणाली की, ‘मला तर लग्नाचं जेवण जेवायला प्रचंड आवडतं. लग्नात असलेला मसालेभात मला इतका आवडतो की, मी त्यासाठी एखादं दिवस उपवास करून देखील जेवायला जाऊ शकते. लग्न जर पुण्यात असेल आणि तिथल्या एखाद्या पारंपरिक मंगल कार्यालयात असेल, तर त्या लग्नातील जेवणाची चवच निराळी असते. असंच एकदा एका लग्नात जेवत असताना मला अक्षरशः बसल्या जागी येऊन सांगण्यात आलं की, मॅडम आता जेवण संपलं आहे. सगळ्यांची जेवणं उरकली आहेत. पंगतही उठली आहे, तेव्हा आता तुम्हीही उठा. अर्थात त्यादिवशी मी उपवास करून मसालेभात खाण्यासाठी लग्नात पोहोचले होते. पिवळी बटाट्याची भाजी, पुरी, जिलेबी, मसालेभात हे पारंपारिक पदार्थ मला प्रचंड आवडतात. त्यामुळे मी पंगतीत बसून जेवू शकते, जेवणं वाढण्याचं काम देखील मी नक्की करेन.’
सायली अर्थात अभिनेत्री जुई गडकरीचा हा किस्सा खूपच भन्नाट आहे. प्रत्यक्ष आयुष्यात जुई गडकरी ही प्रचंड फुडी आहे. तिला वेगवेगळे पदार्थ खायला फार आवडतात. सध्या तिची मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपी शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवले आहे.