‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली देवासमोर उभी राहून शपथ घेऊन, आपलं अर्जुनवर प्रेम असल्याचं सांगणार आहे. इतकंच नाही, तर आमचं लग्न खरं असल्याचं देखील ती म्हणणार आहे. प्रियाने अर्जुन आणि सायली यांच्या आयुष्यात गोंधळ घालण्यासाठी केलेला प्लॅन आता काहीसा फसताना दिसणार आहे. एकीकडे सायलीने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर, चिडलेली पूर्णा आजी पुन्हा एकदा शहनिशा करण्यासाठी चैतन्यला फोन करणार आहे. तर, चैतन्यला फोन करून सायली आणि अर्जुनच लग्न खरं आहे का, असे आजीने विचारले असता तो हो असं उत्तर देतो.
त्यामुळे आता प्रियाने केलेला डाव तिच्यावरच उलटा पडणार आहे. चैतन्यने ‘हो’ म्हटल्यानंतर पूर्णा आजी प्रिया आणि अस्मिताला चांगलेच ऐकवणार आहे. ‘तुम्ही माझ्या नातवाबद्दल माझ्या मनात उगाच काहीही भरवू नका. सायलीबद्दल तुमच्या मनात किती राग आहे, ते मला माहितीये. पण, पुन्हा असं कारस्थान केलं, तर मी तुम्हाला माफ करणार नाही’, अशी तंबी आजीने दोघींना दिली आहे. हे शेवटचं माफ करतेय, असं म्हणत आजी अस्मिता आणि प्रियाला तिथून निघून जायला सांगते. इकडे अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सायली त्याच्याकडे लक्ष देतच नाही. यानंतर अर्जुन कामाला जायला निघतो.
एक नवीन सिम कार्ड घेऊन अर्जुन त्यावरून चैतन्यला फोन करतो आणि घरी घडलेली सगळी परिस्थिती सांगतो, तर, चैतन्य इथं साक्षी असल्याचं म्हणून अर्जुनला आपल्याला येऊन भेट, मग आपण तुला सगळं काही सांगू, असं म्हणतो. आता ठरल्यानुसार अर्जुन चैतन्यला भेटायला जाणार आहे. आणि चैतन्याला भेटल्यावर चैतन्य अर्जुन समोर आपली चूक कबूल करणार आहे. आपणच रागाच्या भरात साक्षीला ही गोष्ट सांगितली होती, त्यामुळेच ती गोष्ट प्रिया आणि पूर्ण आजीपर्यंत पोहोचली असावी, याची कबुली चैतन्य देणार आहे.
यावर अर्जुन चैतन्यला म्हणतो की, ‘आपण भांडलो असलो, तरी आपली मैत्री कायम होती. माझा तुझ्यावर विश्वास होता. मग, तू ही इतकी मोठी गोष्ट साक्षीला कशी काय सांगू शकतोस?’ आता अर्जुन चैतन्यला जाब विचारणार आहे. तर, निराश झालेला चैतन्य स्वतःच्या नशिबाला दोष देत, आपणही कुणालसारखं या जगातून निघून जायला पाहिजे, असं म्हणणार आहे. तर, चिडलेला अर्जुन चैतन्यच्या कानाखाली वाजवणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.