Tharala Tar Mag 8 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. सायली आता प्रतिमा आत्यांना घेऊन घरी आली आहे. मात्र, वीस वर्षांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातामुळे प्रतिमा आत्यांची वाचा आणि स्मृती गेली आहे. सुभेदारांच्या घरात सगळी आपली माणसं असताना देखील प्रतिमा आत्या कोणाला ओळखू शकत नाही. हेच विदारक सत्य सायलीने घरातील सगळ्यांना समजावून सांगितले आहे. प्रतिमा आत्या केवळ सायलीलाच आपलंसं मानत आहेत. मात्र, इतरांबद्दल त्यांच्या मनात अजूनही भीती आहे. गेली वीस वर्ष प्रतिमा आत्या सगळ्यांपासून दूर राहून आपलं आयुष्य जगत होत्या. या काळात त्यांना किती हाल सहन करावे लागले असतील, हे त्यांच्या आताच्या वागण्यावरून सगळ्यांनाच दिसत आहे.
आपल्या मुलीची अशी अवस्था बघून पूर्णाआजी देखील दुःखी झाल्या होत्या. मात्र, काहीही झालं तरी प्रतिमाच्या आठवणी पुन्हा परत आल्याच पाहिजेत, म्हणून सगळेच प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रतिमाला फुलांची खूप आवड होती. म्हणून पूर्णा आजी स्वतः बागेत जाऊन चाफ्याची, गुलाबाची आणि मोगऱ्याची फुलं तोडून घेऊन आल्या आणि ती प्रतिमाच्या रूममध्ये घेऊन गेल्या. दुसरीकडे, प्रतिमा आत्या सावरायचा प्रयत्न करत असतानाच प्रिया मात्र त्यांना गोंधळ टाकायचा प्रयत्न करते. प्रिया प्रतिमा आत्याशी फारच विचित्र पद्धतीने वागत असते. हे बघून आता सायलीला देखील चिड येते. सायली प्रियाला प्रतिमा त्यापासून दूर राहा, असं म्हणते.
मात्र, प्रिया आपले कारनामे बंद करत नाही. या सगळ्यात सायली प्रतिमा आत्यांना सावरायला मदत करते, हे बघून पूर्णा आजीना मनातून खूप बरं वाटतं. तर, प्रतिमा आत्यासोबत सायली देखील आता मुली सारखीच वागू लागली आहे. सायली हीच खरी तन्वी असल्याचे अजूनही कुणालाच माहीत नाही. स्वतः सायली देखील या सत्यापासून अनभिज्ञ आहे. मात्र, प्रतिमा आत्या आणि सुभेदार कुटुंबातील ही दरी कमी व्हावी, यासाठी सायली जोरदार प्रयत्न करत आहे.
सुभेदारांच्या घरात आल्यापासून पहिल्यांदाच प्रतिमा आत्या सगळ्या कुटुंबासोबत जेवायला बसणार आहेत. तर, प्रतिमा आत्यांचं हे वागणं बघून पूर्णा आजी मनातून खूप खूश होणार आहे. डायनिंग टेबलवर बसलेल्या पूर्णा आजी जेवणात मला पोळी आणि लोणचं हवंय, असं कल्पनाला सांगणार आहेत. पोळी आणि लोणचं हे माझ्या प्रतिमाचं आवडत आहे, असं म्हणत पूर्णा आजी स्वतःच्या हातानेच प्रतिमा आत्याला पोळी आणि लोणचं देणार आहेत. तर प्रतिमा आत्यादेखील ते पोळी आणि लोणचं प्रेमाने खाणार आहे. हे बघून सगळ्यांचं मन आनंदाने भरून येणार आहे.