‘ठरलं तर मग’ ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सध्या बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. सायली आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात पडले असले, तरी अजून त्यांनी एकमेकांसमोर याची कबुली दिलेली नाही. आता त्यांचं हे लग्न त्यांना चांगलंच गोत्यात आणणार आहे. सायली आणि अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले होते. मधुभाऊंच्या केसमध्ये सायलीला मदत करण्यासाठी अर्जुनने तिच्याशी लग्न करण्याचा करार केला होता. एकीकडे सायलीला मधुभाऊंना सुखरूप सोडवायचे होते. तर, दुसरीकडे अर्जुनला प्रियाशी लग्न करायचे नव्हते. दोघांच्याही या परिस्थितीवर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तोडगा काढला. मात्र, आता त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य घरातल्यांसमोर उघड होणार आहे.
सायली आणि अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय ही गोष्ट त्या दोघांना सोडून केवळ चैतन्यला माहीत होती. मात्र, अर्जुनशी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात चैतन्यने हे सत्य साक्षी समोर उघड केलं. साक्षीने याचाच फायदा घेत प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या नात्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर, प्रियाने देखील ही संधी साधून सुभेदार कुटुंबावर मोठा बॉम्ब टाकला आहे. साक्षीने प्रियाला आयडिया देत सांगितलं की, आता हीच गोष्ट जाऊन तू पूर्णा आजी आणि सगळ्या सुभेदार कुटुंबाला सांग. साक्षीच्या या सल्ल्यानंतर प्रियाने सुभेदारांच्या घरी जाऊन सगळं काही सांगितलं.
तर, प्रियाचं हे बोलणं ऐकून पूर्ण आजीचा पार चांगला वाढलाय. आता पूर्णा आजी सायलीला जाब विचारणार आहे. इतकंच नाही तर, ती सायलीला हाताला धरून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. मात्र, सायली या सगळ्यांमध्ये गोंधळून गेली आहे. आता पूर्णा आजी सायलीला देवघरात घेऊन जाऊन देवासमोर शपथ घ्यायला लावणार आहे. ‘तुझं आणि अर्जुनच प्रेम खरं आहे का? तुमचं लग्न खरं आहे का? खरं असेल तर शपथ घेऊन सांग’, असं आजी म्हणणार आहे.
तर, सायली देखील देवापुढे उभी राहून ‘माझं आणि अर्जुनच लग्न झालं आहे आणि माझं अर्जुन सरांवर खूप प्रेम आहे’, असं म्हणणार आहे. आता सायलीने तर एकतर्फी प्रेमाची कबुली दिली आहे. पण, सायलीचे हे बोलणं ऐकून अर्जुनला धक्का बसला आहे. पूर्णा आजी सायलीकडून सत्य वदवून घेत असताना अर्जुनने पाहिल्यामुळे आता आजीला सगळ्याच गोष्टी कळणार की, काय याचं टेन्शन त्याला आलं आहे. तो चैतन्यला फोन करून या सगळ्या परिस्थितीची कल्पना देणार आहे. तर, आता चैतन्य देखील काळजीत पडणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.