Tharala Tar Mag 6th February 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना रोमँटिक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायली हनिमूनसाठी माथेरानमध्ये आले आहेत. या दरम्यान त्यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांना एकमेकांपासून लांब ठेवण्यासाठी प्रिया देखील त्यांच्या मागावर माथेरानमध्ये आली आहे. प्रिया सायली आणि अर्जुन राहत असलेल्या हॉटेलमध्ये खोटी वेटर बनून फिरत आहे. आता ती सायलीच्या ड्रिंक्समध्ये दारू मिसळून तिला त्रास देणार आहे.
सायली आणि अर्जुन यांचं नातं खरं नाही, त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही, ही गोष्ट प्रियाला देखील माहित आहे. आता तिला हेच सत्य सगळ्यांसमोर आणायचे आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल पुरावे तिला सापडत नाहीयेत. हेच पुरावे मिळवण्यासाठी प्रिया अर्जुन आणि सायलीच्या पाठोपाठ माथेरानमध्ये पोहोचली आहे. मात्र, अर्जुनला सतत सायलीची काळजी घेताना पाहून तिचा जळफळाट होत आहे. तिला सायलीचा पावलोपावली राग येत आहे. सायली अर्जुनपासून कशी लांब राहील यासाठी प्रिया नवनवे प्लॅन बनवत आहे. आता तिच्या एक प्लॅनला यश मिळणार आहे. सायलीला दारू पाजण्यात प्रिया यशस्वी होणार आहे.
सायली आणि अर्जुन राहत असलेल्या हॉटेलमध्ये प्रिया वेश बदलून वेटर बनून आली आहे. आता सायली आपल्याला ओळखू नये, म्हणून ती दुसऱ्या एका वेटरला ड्रिंक्स घेऊन सायलीकडे पाठवणार आहे. हे ड्रिंक सायलीच प्यायली पाहिजे अशी तंबी देखील तिने वेटरला दिली आहे. तर, आता सायली देखील भाबडेपणाने ते ड्रिंक पिणार आहे. या ड्रिंकमुळे सायली मद्यधुंद झाली आहे. नेमका याच वेळी अर्जुन तिच्यासोबत नाही. आता हे ड्रिंक पिऊन सायली हॉटेलमध्ये धिंगाणा घालायला सुरुवात करणार आहे. मद्याच्या नशेत सायली सगळ्यांना अर्जुन सर कुठे आहेत, असा प्रश्न विचारणार आहे.
तर, सायली पत्नी असून देखील अर्जुनला सर का म्हणत आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडणार आहे. अखेर या ठिकाणी अर्जुनची एन्ट्री होणार असून, बेताल वागणाऱ्या सायलीला सावरण्याचा प्रयत्न अर्जुन करणार आहे. अर्जुन तिला समजावण्याच खूप प्रयत्न करतो. मात्र, ड्रिंकमुळे सायलीला काहीच सुचत नाहीये. आता सायलीला सावरून तिला रूमपर्यंत घेऊन येण्यात अर्जुन यशस्वी होणार आहे. एरव्ही गुपचूप असणारी सायली आता मात्र अगदीच वेगळी भासत आहे. तिचं हे क्युट रूप आता अर्जुनला देखील आवडत आहे. सायली नशेत असताना आता अर्जुन आपल्या मनातील सगळ्या भावना सांगून टाकणार आहे. ‘मिसेस सायली आय लव्ह यु’, असं म्हणून तो आपल्या मनातील भावना सांगून टाकणार आहे. आता सायलीला शुद्धीत आल्यावर या गोष्टी लक्षात राहतील का? हे मालिकेच्या पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे.