Tharala Tar Mag 5 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन पूर्णा आजीवर रागावलेला दिसत आहे. सायलीने हरवलेल्या प्रियाला शोधून काढलं आहे. रविराजच्या घरी पोहचल्यावर सायलीने त्याला प्रियाचा स्वभाव असाच आहे, मी तिला शोधून आणते म्हणत दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर सायली प्रियाला शोधण्यासाठी बाहेर पडली. त्यावेळी पोलिसांनी अर्जुनला फोन करून प्रियाचे लोकेशन घराच्या आसपासच असल्याचे सांगितले. त्यामुळे सायलीने आता घराजवळील बंद जागा शोधायला सुरुवात केली. तेव्हा रविराज यांच्या घराच्या पंपरूममध्ये प्रिया सापडली. प्रियाने स्वतःच या खोलीत लपून आपल्याला कुणीतरी पळवून नेल्याचा बनाव केला, असणार असा अंदाज सगळेच लावतात.
आता सायलीने प्रियाला शोधून काढल्यामुळे रविराज तिचे आभार मानतो. त्यावेळी सायली त्याला खूप प्रेमाने आणि लेकीच्या मायेने समजावून सांगते. यानंतर सगळे घरी जायला निघतात. त्यावेळी सायली म्हणते की, बरं झालं पूर्णा आजी झोपलेल्या होत्या. नाहीतर त्या घाबरल्या असत्या. यानंतर सगळे घरी परततात. सकाळी पूर्णा आजी अर्जुनशी प्रियाविषयी बोलायला जातात. त्यावेळी अर्जुन पूर्णा आजीवरच रागावतो. ‘पूर्णा आजी तूच तिला प्रतिमा आत्याची मुलगी म्हणून डोक्यावर बसवून ठेवलं आहेस. ती म्हणूनच अशी कामं करते’, असं म्हणत अर्जुन आजीवरच रागावतो. इतकंच नाही तर अर्जुन आजीशी बोलणं देखील बंद करतो.
अर्जुन रागावल्यामुळे आणि बोलत नसल्यामुळे पूर्णा आजी दुःखी होतात. यावेळी आता सायली त्याच्या रुममध्ये जाऊन अर्जुनची समजूत काढण्याचा एक प्लॅन सांगणार आहे. रागवलेल्या अर्जुनचा रुसवा दूर करण्यासाठी सायली आजीला सांगते की, ‘तुम्ही आजारी पडल्याचं नाटक करा. यावेळी तुम्हाला खूप वेदना होत आहेत, असं दाखवा. मग, अर्जुन सर घाबरतील आणि त्यांचा राग पळून जाईल. ते तुमच्याशी लगेच बोलायला लागतील.’ आता पूर्णा आजीला देखील सायलीचा हा प्लॅन आवडला आहे. दोघी मिळून आता हा प्लॅन पूर्णत्त्वास नेणार आहेत.
सायली आणि पूर्णा आजी आता ठरल्याप्रमाणे आपला प्लॅन सुरू करणार आहेत. यावेळी आजी सोफ्यावर बसून अचानक छातीत दुखायला लागल्याचं नाटक करणार आहेत. यावेळी आजीला ओरडताना पाहून घरातील सगळीच मंडळी घाबरून जाणार आहेत. सगळेच आजीला डॉक्टरकडे नेऊया असं म्हणत रुग्णवाहिका बोलवणार आहे. मात्र, त्यावेळी अर्जुन तिथे येऊन ‘आजीला कुठेही नेऊ नका, ती म्हातारी आहे. रस्त्यावर किती खड्डे आहेत त्यात काही झालं तर..’ असं म्हणतो. त्यावेळी आजी चटकन उठून उभी राहून अर्जुनला दटावणार आहे. यानंतर आजीच्या या नाटकात आपली बायको देखील सामील होती, असं म्हणत अर्जुन सायलीला देखील आजीसोबत उभं करणार आहे. यानंतर घरातील सगळेच हसू लागणार आहेत.