‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात शिवानी सायली आणि अर्जुनच्या घरी आलेली पाहायला मिळाली आहे. शिवानीचं नाव श्वेता असल्याचं अर्जुनने घरातील सगळ्यांना सांगितले आहे. श्वेता ही सायलीच्या आश्रमातील तिची मैत्रीण असून, तिचा उद्या पेपर आहे म्हणून, ती इथे आली आहे, असे अर्जुनने सगळ्यांना सांगितले आहे. तर सायलीने देखील पेपरपर्यंत शिवानीला म्हणजेच श्वेताला आपल्याच घरी राहू देण्याची परवानगी सुभेदार कुटुंबाकडून घेतली आहे. त्यामुळे आता शिवानी सुभेदारांच्या घरात सुखरूप राहणार आहे. सुरुवातीला शिवानीने सायलीचं ऐकण्यास नकार दिला होता. तिला आपल्या जीवाची भीती वाटत होती. मात्र, सायलीने तिला तिच्या सुरक्षिततेची हमी दिली आणि सायलीवर विश्वास ठेवून शिवानी देखील तिच्या घरी जायला तयार झाली.
मधुभाऊंच्या केसमध्ये शिवानीने सुरुवातीला खोटा जबाब दिला होता. साक्षीच्या धमकावण्यावरूनच तिने हा जबाब दिला होता. याबद्दलची कुणकुण आता सायली आणि अर्जुनला लागली होती. इतकंच नाही तर पुरावे देखील मिळाले होते. त्यामुळे त्यांनी शिवानीला शोधून काढून तिने खरा जबाब कोर्टासमोर द्यावा अशी विनंती केली. तर, यामुळे तुझ्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे देखील अर्जुन आणि सायली म्हणाले. आता शिवानी सायली आणि अर्जुनच्या घरी अगदी सुरक्षित राहिली आहे.
मात्र आता कोर्टाची तारीख असल्याने अर्जुन आणि सायली सोबत शिवानीला देखील कोर्टात हजर राहावे लागणार आहे. तिघेही कोर्टाच्या सुनावणीसाठी निघणार असतानाच, तिथे खोट्या तन्वीची म्हणजे प्रियाची एन्ट्री होणार आहे. कोर्टात सुनावणीसाठी जाण्याऐवजी प्रिया इथे का आली आहे?, असा प्रश्न अर्जुन आणि सायलीला पडणार आहे. तेव्हा, शिवानी तिथे बसली आहे, हे लक्षात घेऊन अर्जुन सायलीला तन्वी आल्याचं म्हणत खुणावणार आहे. प्रिया इथे आली आणि तिने शिवानीला बघितलं, तर ती लगेच ओळखणार, हे लक्षात आल्यामुळे सायली लगबगीने शिवानीला घेऊन तिच्या वरच्या रूममध्ये जाणार आहे.
तितक्यात प्रिया घरात शिरणार आहे. सुदैवानं वर जात असलेल्या शिवानीच्या बाजूला सायली असल्याने शिवानीचा चेहरा प्रिया बघू शकली नाही. मात्र, सायली बरोबर ती मुलगी कोण होती, असा प्रश्न तिने सगळ्यांसमोर केला. त्यावेळेस आजी म्हणाली की, ‘ती सायलीची आश्रमातील मैत्रीण आहे. श्वेता नाव आहे तिचं.. तिची परीक्षा असल्याने इकडे आली आहे.’ तेव्हा प्रिया त्यांना सांगते की, आमच्या आश्रमात श्वेता नावाची कोणतीही मुलगी नव्हती, मग ही सायलीची मैत्रीण नेमकी आहे तरी कोण?’ प्रियाच्या या बोलण्यामुळे आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आता अर्जुन आणि सायली शिवानीला सुखरूप कोर्टात घेऊन जाऊ शकतीलका, हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या