Tharala Tar Mag 29 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेक्षकांना एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. सायलीच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रियाने सायलीला जिन्यावरून ढकलून दिल्यामुळे ती खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली होती. मात्र, आता तिच्या जीवाला मोठा धोका निर्माण होणार आहे. याची कल्पना अश्विन अर्जुनला देणार आहे. तर, सायलीला या अवस्थेत पाहून अर्जुन खचून जाणार आहे. प्रिया आता यामुळे खूप खूश होणार आहे. आपल्यातील आणि अर्जुनमधील हा काटा नाहीसा झाला, असं तिला वाटत आहे. मात्र, लवकरच तिचं पितळ उघडं पडण्याची शक्यता आहे.
सुभेदार कुटुंबात नुकताच कृष्णजन्म सोहळा पार पडला. यावेळी देखील सायलीने कृष्णाचा पाळणा म्हटला. तर, प्रतिमा आत्याने स्वतःहून सगळ्यांसाठी पंचामृताचा प्रसाद बनवला. त्यामुळे घरातील सगळी मंडळी खूप खूश झाली आहे. आता प्रतिमा हळूहळू घरातील लोकांमध्ये रमायला लागली आहे. त्यामुळे तिच्या आठवणी लवकरच परत येतील, अशी आशा सगळ्यांना वाटू लागली आहे. मात्र, हे आता प्रियाला बघवत नाहीये. प्रिया प्रतिमाला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करतेय. तिला काही आठवलं तर आपलं खरं नाही, हे प्रिया आधीच जाणून आहे. म्हणूनच प्रतिमाला आपल्या रस्त्यातून दूर कसं करायचं याचा विचार ती करत आहे.
कृष्णजन्म सोहळ्याआधी सायली अर्जुनवर रागावली होती. तर, अर्जुनला तिच्या रागाचं कारण कळलं नव्हतं. त्याने अनेकदा विचारल्यावर सायलीने त्याला प्रिया काय म्हणाली ते सांगितलं. त्यावर उत्तर देताना अर्जुन म्हणाला की, त्याने कोणतीही गोष्ट प्रियाला सांगितलेली नाही. त्यामुळे सायलीने चिडण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, त्याच वेळी त्याला आठवलं की, प्रियाने आपल्या फोनमध्ये डोकावून पाहिलं होतं, त्यामुळे तिला ती लंच मिटिंगची गोष्ट कळली. हे त्याने सायलीला सांगताच आता तिचाही गैरसमज दूर झाला आहे. आता ती प्रियालाच अर्जुनच्या जवळ जाण्यापासून रोखणार आहे.
प्रिया मुद्दाम सतत अर्जुन आणि सायलीच्या खोलीत जात असते. हीच गोष्ट सायलीला अजिबात पटत नाही. त्यामुळे ती यावेळी प्रियाला अडवायला जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, प्रिया तिच्याशी वाद घालून सायलीला जोराने ढकलून देते. प्रियाने दिलेल्या धक्क्यामुळे सायली जिन्यावरून खाली पडणार असून, तिला गंभीर दुखापत होणार आहे. तिच्या शरीरावर कोणतीही जखम झाली नसली तरी, तिच्या मेंदूला जबर मार लागल्याची शक्यता असल्याचे डॉक्टर सांगणार आहेत. तर, सायलीला शुद्ध देखील येत नसल्याने आता अर्जुन काळजीत पडला आहे.