‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना रविराज अर्जुनची माफी मागताना पाहायला मिळणार आहे. यावेळी तो अर्जुनचं कौतुक करताना देखील पाहायला मिळणार आहे. अर्जुननी महिपत विरोधात गोळा केलेले पुरावे हे किती महत्त्वपूर्ण होते आणि हे पुरावे मिळवण्यासाठी त्याने काय काय कष्ट केले, याचे रविराज तोंड भरून कौतुक करणार आहे. दुसरीकडे, रविराज बरोबरच चैतन्याला देखील महिपतच्या या कटकारस्थानाबद्दल कळणार आहे. सुभेदारांच्या औषध कंपनीच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवून प्रताप सुभेदार यांना फसवणाऱ्या महिपत शिखरे याचा खरा चेहरा अर्जुनने सगळ्यांसमोर आणला आहे.
महिपतच्या विरोधातील सगळे पुरावे गोळा करून ते कोर्टासमोर सादर करून, अर्जुननी आपल्या वडिलांना म्हणजेच प्रताप सुभेदार यांना निर्दोष सिद्ध केले आहे. तर, सन्मानानं तो त्यांना घरी देखील घेऊन आला आहे. आता सुभेदार कुटुंबातील सगळीच मंडळी अर्जुन तोंडभरून कौतुक करत आहेत. सायलीला देखील कौतुकाची थाप मिळत आहे. आता रविराज चैतन्यला घेऊन अर्जुन सुभेदारच्या घरी जाणार आहे. यावेळी रविराज अर्जुनची माफी मागून त्याला शाबासकीची थाप देणार आहे. तर, चैतन्य देखील रविराज यांचा असिस्टंट म्हणून अर्जुनच्या घरी पोहोचणार आहे.
अर्जुन देखील रविराजबद्दल मनात राग न बाळगता त्याला माफ करणार आहे. यामुळे पुन्हा एकदा अर्जुन आणि रविराज यांची दिलजमाई झालेली पाहायला मिळणार आहे. आता रविराज आणि अर्जुन यांची एकी झालेली पाहून तरी चैतन्याचा गैरसमज दूर होईल का? आणि तो अर्जुनकडे परत येईल का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
दुसरीकडे, आता अर्जुन आणि सायलीमधील जवळीक वाढत आहे. प्रताप सुभेदार यांना सोडवण्यासाठी अर्जुन आणि सायलीने केलेले प्रयत्न फळाला आले आहेत. अर्जुनने केलेला युक्तिवाद पाहून सायली देखील त्याच्यावर प्रभावित झाली आहे. महिपतच्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी सायलीला अर्जुननेच मदत केली होती. अर्जुनला आपली इतकी काळजी आहे हे समजल्यानंतर आता सायलीला देखील त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले आहे. मात्र, आपल्या मनातील या प्रेमाची चाहूल सायलीला लागेल का आणि ती आपल्या मनातील प्रेमाचा स्वीकार करेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.