Tharala Tar Mag 26 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता मोठा ट्वीस्ट येणार आहे. सायली आता प्रतिमा आत्यांना घेऊन सुभेदारांच्या घरात येणार आहे. मात्र, प्रतिमाच्या येण्याने आता घरात चांगलाच गदारोळ माजणार आहे. एकीकडे सुभेदारांना आनंद होणार आहे. तर, दुसरीकडे सगळ्यांनाच मोठा धक्का देखील बसणार आहे. सायली प्रतिमा आत्याला शोधायला घराबाहेर पडली होती. अखेर आता तिला प्रतिमा भेटली आहे. सायली आणि अर्जुन अलिबागला असताना, त्यांना एक महिला दिसते जिला ट्रक उडवणार असतो. मात्र, सायली वेळीच त्यांचे प्राण वाचवते. त्यावेळेस त्या बाई प्रतिमा आत्या असल्याचे सायलीच्या लक्षात आलं.
सायलीने घरी आल्यानंतर अर्जुनला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अर्जुन देखील तिच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. त्यामुळे आता सायलीने तिला शोधून घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतला होता. सायली भर पावसात प्रतिमा आत्याला शोधण्यासाठी बाहेर पडली होती. मात्र, तिने घरात कुणालाच याची कल्पना दिली नव्हती. आता अर्जुन घरी आल्यानंतर त्याला सायली कुठेच दिसत नसल्याने त्याने घरात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा सायली घरात नसल्याचं अर्जुनला कळणार आहे. मात्र, सायली नेमकी कुठे गेली हे कुणालाच माहित नसल्याने सगळ्यांच्या जीवाला घोर लागणार आहे.
दुसरीकडे, सायलीला सगळीकडे विचारपूस करून देखील प्रतिमा आत्या भेटत नसल्याने ती वैतागली होती. यानंतर तिने देवीच्या मंदिरात जाऊन साकडं घातलं. त्यावेळी देवळातील गुरुजींनी सायलीला प्रसादाचं ताट देऊन तो सगळ्यांमध्ये वाटण्यास सांगितला. देवीचा हा प्रसाद वाटत असतानाच सायलीला पायऱ्यांवर बसलेली प्रतिमा आत्या दिसली आणि तिचा जीव भांड्यात पडला. यावेळी सायली प्रतिमा आत्याच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करणार आहे. मात्र, त्या सायलीला घाबरून जाणार आहेत. आपण इतके प्रश्न विचारून देखील प्रतिमा आत्या काहीच उत्तर देत नाहीयेत, हे सायलीच्या लक्षात येतं.
सायली पुन्हा एकदा प्रतिमाशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना, तिला कळणार आहे की, प्रतिमा आत्यांची वाचा आणि स्मृती गेली आहे. मात्र, यामागचं कारण तिला कळणार नाहीये. तरीही ती प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येणार आहे. आता सायलीसोबत घरी आलेली प्रतिमा सगळ्यांनाच बघून घाबरणार आहे. मात्र, पूर्णा आजी तिला लगेचच ओळखणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे.