Tharala Tar Mag 26 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक मोठं धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आतापर्यंत प्रतिमा आत्याच्या आठवणी परत याव्यात म्हणून सायली जोरदार प्रयत्न करताना दिसली होती. मात्र, या सगळ्यात तिच्या स्वतःकडे देखील तिच्या बालपणीच्या आठवणी नाहीत, हे ती विसरून गेली होती. परंतु, आता या मालिकेत एक धक्कादायक घटना घडताना दिसणार आहे. या घटनेमुळे कथानकाला एक वेगळं वळण मिळणार आहे. सध्या प्रतिमा आत्यांच्या आठवणी परत आणण्याचा प्रयत्न घरातील सगळेच करत आहेत. मात्र, आता सगळ्यांना सायलीकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
सध्या सायली सगळ्या घरातील लोकांची मन जपत असल्यामुळे तिला अर्जुनला फारसा वेळ देता येत नाहीये. याचाच फायदा घेऊन प्रिया अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. तर, प्रियाकडून खरं काढून घेण्यासाठी अर्जुन देखील तिच्याशी मैत्रीनेच वागत आहे. परंतु, प्रियाचं सतत आपल्याजवळ येणं अर्जुनला देखील आवडत नाहीये. आता सायलीला देखील तिचा राग येऊ लागला आहे. प्रतिमा आत्याच्या आठवणी परत येऊ नयेत, नाहीतर आपलं बिंग फुटेल या उद्देशाने प्रिया प्रतिमाला सतत धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. आता हीच गोष्ट सायलीच्या नजरेस पडणार आहे. प्रिया प्रतिमा आत्याला त्रास देतेय हे बघून आता सायली चिडून प्रियाच्या कानाखाली आवाज काढणार आहे.
आता सायलीने आपल्या कानाखाली मारली याचाच बदला प्रिया घेणार आहे. आता प्रिया अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आणखी कसोशीने करणार आहे. मात्र, ही गोष्ट आता सायलीच्या लक्षात येणार आहे. सायली प्रियाला सतत अर्जुनच्या जवळ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रिया अर्जुनसाठी ऑफिसमध्ये पोहोचणार आहे, तर सायली देखील तिच्या मागोमाग तिथे जाणार आहे. मात्र, घरी आल्यावर पुन्हा प्रिया अर्जुनशी लगट करू लागणार आहे. हे बघून सायलीचा संताप होणार आहे.
आता सायली स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना प्रिया मुद्दामहून अर्जुनच्या रूममध्ये जाण्यासाठी वर जाणार आहे. त्याचं वेळी सायलीचं लक्ष तिच्याकडे जाणार आहे. प्रियाला आपल्या खोलीकडे जाताना पाहून चिडलेली सायली हातातील कामं सोडून वर धाव घेऊन प्रियाला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. तू आमच्या खोलीत जायचं नाहीस, हे सायली प्रियाला सांगत असताना प्रिया तिला जिन्यावरून ढकलून देणार आहे. प्रियाच्या धक्क्यामुळे आता सायली वरून खाली कोसळणार आहे. सायलीला जमिनीवर पडलेलं पाहून आता अर्जुन देखील धावून येणार आहे. सायलीला बेशुद्ध पाहून अर्जुनला धक्का बसणार आहे.