‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन आता महिपत विरोधातील पुरावे शोधताना दिसणार आहेत. सायली किडनॅप होण्यापूर्वी संतोषने तिला महिपत आणि साक्षी विरोधात सगळे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह दिला होता. या पेनड्राईव्हमध्ये महिपत आणि साक्षी विरोधातील सगळे पुरावे होते. मात्र, संतोष हा पेन ड्राईव्ह सायलीला देत असतानाच साक्षीने त्यांना पाहिलं आणि नंतर सायलीला थेट किडनॅप केलं. किडनॅपिंग होत असताना देखील मोठ्या धैर्याने सायलीने तो पेन ड्राईव्ह एका ठिकाणी लपवला. आता गुंडांच्या तावडीतून सुखरूप सुटून आल्यानंतर सायली आणि अर्जुन मिळून या प्रकरणाचा तपास करणार आहेत.
यावेळी संतोषने आपल्याला सगळे पुरावे दिल्याचा खुलासा सायलीने केला आहे. तर, हे सगळे पुरावे असलेला पेनड्राईव्ह आपण महिपतच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका बाईकच्या डीकीमध्ये ठेवल्याचे सायली सांगणार आहे. त्यावेळी सायलीने त्या बाईकचा नंबर देखील लक्षात ठेवला होता. हा बाईकचा नंबर ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलणार आहेत. ही बाईक दुसऱ्या-तिसऱ्या कुणाची नसून, चैतन्यची आहे. याचाच अर्थ सायलीने पुराव्यांचा पेन ड्राईव्ह चैतन्याच्या बाईकमध्ये ठेवलेला आहे. आता अर्जुन चैतन्य आणि त्याची बाईक शोधण्यासाठी बाहेर पडणार आहे. तर, चैतन्यच्या बाईक मधून लवकरात लवकर तो पेन ड्राईव्ह मिळवून, ते पुरावे सगळ्यांसमोर सादर करावेत, इतकंच ध्येय अर्जुनच्या डोळ्यासमोर आहे.
दुसरीकडे साक्षी आणि महिपत हे दोघे देखील पुराव्यांचा पेन ड्राईव्ह सापडत नसल्याने बैचेन झाले आहेत. साक्षी आणि महिपत पुराव्यांच्या पेनड्राईव्हबद्दल बोलत असताना तिथे चैतन्य येणार आहे. दोघांचं पेन ड्राईव्हबद्दलचं संभाषण ऐकून चैतन्य म्हणणार आहे की, तो पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे. चैतन्यने तो पेनड्राईव्ह बघितला असेल, तर आपल्या दोघांचं बिंग फुटलं, या विचाराने साक्षी आणि महिपत घाबरून गेले आहेत. मात्र, चैतन्य सांगत असलेल्या पेन ड्राईव्ह एका वेगळ्याच कामाचा असल्याचा समोर येते.
त्यामुळे आता खरे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह नेमका कुठे गेला, याची शोधाशोध होणार आहे. दुसरीकडे, अर्जुन आणि सायली एकत्र मिळून चैतन्याचा पाठलाग करणार असून, त्याच्या गाडीतून पेनड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता या प्रयत्नात अर्जुन आणि सायलीला यश मिळते की, नाही हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या