Tharala Tar Mag 21 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रेक्षकांना एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता रक्षाबंधन सोहळा पार पडताना दिसणार आहे. सुभेदारांच्या घरात प्रतिमा आत्या आल्यामुळे यंदाची रक्षाबंधन खास असणार आहे. गेली अनेक वर्ष प्रताप सुभेदार यांचा हात रिकामाच होता. दर रक्षाबंधनाला त्यांना त्यांच्या बहिणीची खूप आठवण यायची. मात्र, यावेळी त्यांची बहीण घरी परतून आली आहे. पण, तिला काहीच आठवत नसल्याने ती आपल्याला भाऊ म्हणून राखी बांधेल का? असा प्रश्न त्यांना पडला आहे. परंतु, सायली आता प्रतिमा आत्यांना यासाठी तयार करणार आहे. सुभेदार कुटुंबातील नाती सायली घट्ट बांधून ठेवणार आहे.
प्रतिमा आत्या आता हळूहळू सुभेदार कुटुंबात रमायला लागल्या आहेत. त्यांनी या कुटुंबात आपलं स्थान शोधायला सुरुवात केली आहे. काहीही जुन्या आठवणी त्यांच्याजवळ नसल्या तरी, आता नवी आठवणी तयार करण्यासाठी त्या सज्ज होताना दिसत आहेत. आता सायली त्यांची या प्रवासात साथ देणार आहे. प्रतिमा आत्यांच्या जुन्या आठवणी परत आणण्यासाठी सायली सगळे प्रयत्न करून बघत आहे. तर, आता प्रतिमा आत्या देखील तिच्या प्रयत्नांना साथ देणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुभेदार कुटुंबात राखी बांधण्याच्या सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली आहे. मात्र, प्रताप शुभेदारांच्या मनात अजूनही प्रश्न आहेत.
‘माझी बहीण प्रतिमा या घरात परत आली आहे. पण तिला काही आठवतच नाहीये. अशा परिस्थितीत ती मला राखी बांधेल का?’, असं प्रताप बोलणार आहे. तर, आपल्या सासऱ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर सायली त्यांना एक छान सरप्राईज देणार आहे. सायली प्रतिमा आत्यांना तयार करून रक्षाबंधनासाठी घेऊन येणार आहे. ‘त्यांना आठवत नाही म्हणून काय झालं? तुम्हाला तर माहित आहे ना की हीच आपली बहीण आहे. मग या नात्यात दुरावा कसा येईल?’, असं सायली बोलणार आहे. तर, सायलीच्या या शब्दांना मान देत प्रतिमा आत्या आपल्या भावाला म्हणजे प्रतापला राखी बांधणार आहे. यावेळी प्रताप सुभेदारांना आपले अश्रू अनावर होणार आहेत. तर, प्रतिमा आत्या मनातून आनंदी होणार आहेत.
सायली आपलं हे संपूर्ण कुटुंब कसं एकत्र बांधून ठेवतेय, कशी सगळ्यांची काळजी घेऊन मनं जप्तेय, हे बघून आता पूर्णा आजीला खूप आनंद होणार आहे. एकीकडे भाऊ बहिणीच्या प्रेमळ बंधनाचा सोहळा सुरू असताना एक राखी सायलीच्या हाती बांधून पूर्णा आजी तिला आपलं कुटुंब बांधून ठेवणारी तूच आमची रक्षक आहेस, असं म्हणणार आहेत.