‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागातही प्रेक्षकांना धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. अर्जुन नाही म्हणत असताना देखील त्याला रंग लावायला आलेली प्रिया आता सायलीकडून चांगलीच बोलणी खाणार आहे. अर्जुन अनेकदा नाही म्हणत असताना देखील, प्रिया त्याला रंग लावण्यासाठी जबरदस्ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. दोघांच्या जवळच उभ्या असलेल्या सायलीने हा सगळा प्रकार पाहिला. अर्जुनला आवडत नसताना देखील प्रिया त्याला बळजबरीने रंग लावायचा प्रयत्न करते, हे पाहून सायली चांगली संतापली. सायलीने जाऊन प्रियाला इतका जोराचा धक्का दिला की, ती थेट रंगांच्या ताटात जाऊन पडली.
‘माझ्या नवऱ्यावर फक्त माझा अधिकार आहे. तू माझ्या संसारावर डोळा ठेवू नकोस. अनेकदा तुला समजावूनही तू ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेस, हे मी तुला शेवटचं समजावतेय. माझ्या संसारापासून आणि माझ्या नवऱ्यापासून दूर राहा’, असं सायलीने प्रियाला म्हटलं आहे. मात्र, सायली प्रियाशी ज्याप्रकारे वागली ते पूर्णा आजीला अजिबात पटलेलं नाही. प्रिया ही पूर्ण आजीची अतिशय लाडकी आहे. त्यामुळे सायलीचं प्रियाशी वागणं आजीला पटलेलं नाही. ती आता सायलीला सुनावणार इतक्यात अर्जुन आपल्या बायकोची बाजू घेऊन आजी समोर उभा राहणार आहे.
मात्र, सायलीची बाजू घ्यायला निघालेल्या अर्जुनला सायली स्वतःच थांबवणार आहे आणि पूर्णा आजीला चोख उत्तर देणार आहे. ‘आजी मी काय चुकीचं वागले, तुम्हीच मला सांगा. तुम्हीच नेहमी म्हणता की, आपला नवरा हा आपला असतो. मग, त्याच्याजवळ एखाद्या परक्या स्त्रीने जाणं, हे मी कसं खपवून घेऊ? तुम्हीच म्हणता की, नवरा बायकोने कायम एकत्र रहावं. पण, ही प्रिया दरवेळी काहीना काही कारण सांगून, अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. मी नेहमी या गोष्टी शांतपणाने घेते. पण, यावेळी मी कुणाचंही ऐकणार नाही. बायको म्हणून अर्जुनवर पहिला अधिकार माझा आहे’, असं पूर्णा आजीला ठणकावून सांगून सायली अर्जुनला रंग लावायला निघून जाते.
सायलीचे हे रूप पाहून अर्जुन मनातून आनंदून गेला आहे. तो सायली म्हणतो की, ‘मी नेहमी तुम्हाला सांगत असतो आजीला किंवा प्रियाला तुम्ही तुमच्याच भाषेत उत्तर देत जा. मात्र, आज तुम्ही ती हिंमत दाखवली. तुमचं हे रूप पाहून मला खरंच आनंद झाला आहे.’ तर, अर्जुनचं बोलणं ऐकल्यानंतर सायलीला देखील आपण आज काहीतरी वेगळंच वागलो आहोत याची जाणीव होते. आता सायलीच्या मनात देखील अर्जुनसाठी प्रेमांकुर फुटू लागला आहे.