‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि चैतन्य यांचं टेन्शन वाढताना दिसणार आहे. पत्रकार परिषद घेऊन साक्षीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही चांगलेच अडचणीत आले आहेत. बार काऊन्सिलने दोघांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोघांचा व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. नामवंत वकील असणाऱ्या अर्जुन आणि चैतन्य यांच्या हातून आता एकेक करून सगळी कामं निघून जायला लागली आहेत. त्यामुळे दोघेही टेन्शनमध्ये आले आहेत. दुसरीकडे त्यांच्या ऑफिसवर हल्ला देखील झाला आहे. त्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये आले आहेत.
यावेळी आता सगळ्यांना सायलीचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. सायली या हाणामारीचा व्हिडीओ शूट करून, आता सगळ्यांना धमकी देणार आहे. तुम्ही तोडफोड थांबवली नाही तर मी पोलिसांत जाऊन हा व्हिडीओ देईन, अशी धमकी सायली सगळ्यांना देते. सायलीच्या या धमकीमुळे भाडोत्री गुंड तिथून निघून जातात. त्यावेळी सायलीचा अवतार पाहून सगळेच थक्क होतात. दुसरीकडे सायली सगळ्या स्टाफला घरी सोडायला सांगते. अर्जुनही तिचं म्हणणं मान्य करून सगळ्यांना सुखरूप घरी जायला सांगतो. आता सायली सगळी धुरा आपल्या हाती घेणार आहे.
सायलीचे प्रयत्न पाहून आता रविराज किल्लेदार देखील त्यांच्या मदतीला धावून जाणार आहेत. आपलाही अर्जुन आणि चैतन्यवर पूर्णपणे विश्वास असून, त्यांना यातून सुखरूप सोडवण्यासाठी मी स्वतः देखील प्रयत्न करेन, असा निर्णय ते घाटात. रविवार किल्लेदार स्वतः बार काऊन्सिलमध्ये जाऊन तिथे अर्जुन आणि चैतन्य यांची बाजू मांडणार आहेत. आजवर दोघांनीही कोणतंही चुकीचं कृत्य केलेलं नाही. त्यामुळे बार काऊन्सिलने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी दोघांच्या कामाचा नीट आढावा घ्यावा, अशी विनंती ते करणार आहेत. त्यामुळे आता बार काऊन्सिल देखील अर्जुन आणि चैतन्यवरील कारवाई आणि सुनावणी काहीकाळ पुढे ढकलणार आहे.
कारवाई काहीकाळ टळली असली, तरी आता दोघांच्या हातून सगळी कामं निघून गेली आहेत. हातात एकही केस नसल्यामुळे दोघेही हताश झाले होते. यावेळी आता सायली पुन्हा दोघांचं मनोबल वाढवणार आहेत. ‘तुम्ही असं कसं म्हणता की तुमच्या हातात एकही काम नाही? आपल्याकडे मधुभाऊंची केस आहे. ती अजूनही सुटलेली नाही. चला मिळून त्यावर काम करूया’, असं म्हणत सायली सगळ्यांना नवा उत्साह देणार आहे. यात रविराज देखील तिघांना साथ देताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या