मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मधुभाऊंची केस सुटणार! सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दुरावणार? ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

मधुभाऊंची केस सुटणार! सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दुरावणार? ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 15, 2024 03:34 PM IST

सायलीने आता हातात कॅलेंडर घेऊन त्यावर दिवस मोजायला सुरुवात केली आहे. करारानुसार सायली आणि अर्जुन यांच लग्न आता अवघ्या दोनच दिवसांसाठी शिल्लक राहिले आहे.

मधुभाऊंची केस सुटणार! सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दुरावणार?
मधुभाऊंची केस सुटणार! सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दुरावणार?

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे. साक्षी आणि महिपत यांचा डाव उधळून लावण्यासाठी आता चैतन्य, सायली आणि अर्जुन तिघेही मिळून प्रयत्न करत आहेत. चैतन्य साक्षी सोबत प्रेमाचं नाटक करून, तिच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. चैतन्य आणि साक्षी नाश्त्यासाठी बसलेले असताना चैतन्य आता तिच्याकडे आपल्याला सँडविच खायचं आहे, असं म्हणून तिला सँडविच बनवण्यास सांगणार आहे. तर, साक्षी सँडविच बनवण्यासाठी जाताच, चैतन्य तिचा फोन घेऊन पासवर्ड टाकायचा प्रयत्न करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, इतक्यातच साक्षीच्या फोनवर महिपत शिखरेचा फोन येणार आहे. चैतन्य हा फोन उचलणार असून, कुणाला संशय येऊ नये म्हणून, तो फोन लगेच कट करणार आहे. या फोनवर महिपत मधु भाऊंच्या प्रकरणाबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, हे चैतन्यने ऐकल्यानंतर आता चैतन्य अर्जुनला फोन करून ही गोष्ट सांगणार इतक्यात साक्षी तिथे येते आणि चैतन्याच्या हातातून फोन काढून घेते. तर, चैतन्य देखील खोटं नाटक करत ‘तू समोर असताना मी फोनकडे बघणार नाही, सॉरी चूक झाली’, असं म्हणून तिची माफी मागणार आहे. तुरुंगात असलेल्या महिपतकडे फोन असून, तो मधुभाऊंच्या प्रकरणात काहीतरी करतोय, ही माहिती चैतन्य लवकरच अर्जुनपर्यंत पोहोचवणार आहे.

कार्तिक आर्यनचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळ्यांनाच बसला धक्का! ‘चंदू चॅम्पियन’चा लूक पाहिलात का?

सायलीने केली दिवस मोजायला सुरुवात!

दुसरीकडे, सायलीने आता हातात कॅलेंडर घेऊन त्यावर दिवस मोजायला सुरुवात केली आहे. करारानुसार सायली आणि अर्जुन यांच लग्न आता अवघ्या दोनच दिवसांसाठी शिल्लक राहिले आहे. पुढच्या दोन दिवसानंतर त्यांच्यातील लग्नाचा करार संपणार असून, सायली आणि अर्जुन यांचे मार्ग वेगळे होणार आहेत. दोघांनाही या गोष्टीचं दुःख होत आहे. मात्र, एकमेकांवर असलेले प्रेम अद्यापही दोघांनी बोलून दाखवलेलं नाही. तर एकमेकांवर प्रेम असलं, तरीही करारातील एका क्लॉजनुसार दोघेही मधुभाऊंची केस सुटेपर्यंत प्रेमात पडू शकत नाहीत. त्यामुळे आता दोघेही खूपच दुःखी झाले आहेत.

सायलीला थांबवू शकेल का अर्जुन?

सायली अर्जुनला आठवण करून देते की, आता दोनच दिवस राहिले आहेत. दोन दिवसानंतर आपलं लग्न संपून जाईल आणि मी इथून निघून जाईन. रूमबाहेर जाणाऱ्या सायलीला थांबवण्यासाठी अर्जुन तिच्या मागे धावणार आहे. मात्र, यावेळी अर्जुनच्या पायाला जोरात ठेच लागणार आहे. ठेच लागल्यामुळे विव्हळणाऱ्या अर्जुनला पाहून सायलीच्या डोळ्यात पाणी येणार आहे. ती लागलीच मलम घेऊन त्याच्या पायाला लावू लागणार आहे. ‘मी आहे म्हणून हे सगळं करतेय, दोन दिवसानंतर हे सगळं कोण करेल? तुमच्यासाठी एक माणूस ठेवू का आता?’, असं प्रेमानं दटावत असताना अर्जुन सायलीलाच घरी राहण्याची विनंती करणार आहे. मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.

IPL_Entry_Point