‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन पुन्हा एकदा सायलीच्या बाजूने बोलताना दिसणार आहे. सुभेदारांच्या घरात सध्या अर्जुनच्या रियुनियन पार्टीची जोरदार चर्चा चालू आहे. अर्जुन सुभेदार हा एक वकील असून, त्याची बायको म्हणजे सायली ही गृहिणी आहे. यावरूनच आता अस्मिता तिला चार शब्द ऐकवणार आहे. अर्जुनच्या कॉलेजच्या मित्रांनी त्यांचा रियुनियन सोहळा आयोजित केला आहे. या रियुनियनमध्ये अर्जुन सायलीला घेऊन जाणार का? असा प्रश्न अस्मिता सायलीला करणार आहे.
अस्मिताने हा प्रश्न सायलीला विचारतात सुरुवातीला सायली लाजली, तर कल्पना म्हणाली की, ‘हा काय प्रश्न आहे का? अर्जुन सायलीला घेऊनच जाणार! ती त्याची बायको आहे. त्यामुळे अर्जुनसोबत सायली नक्की जाणार.’ यावर टोमणा मारत अस्मिता म्हणाली की, ‘ही सायली त्या वकिलांमध्ये जाऊन काय करणार? ते सगळे वकील आपआपली चर्चा करत असतील. त्यांच्याशी हिला काय बोलायला जमणार आहे? आणि हिला त्यांच्याशी बोलता आलं नाही, तर त्यांना कळणार की अर्जुनची बायको ही त्याच्या तोलामोलाची किंवा त्याला मॅचिंग असणारी नाही. सगळ्यांमध्ये त्यांचं हसं होईल.’
अस्मिताचं हे बोलणं ऐकून सायलीला खूपच वाईट वाटणार आहे. मात्र, त्याचवेळी अर्जुन तिथे येऊन अस्मितालाच चार शब्द सुनावणार आहे. ‘मॅचिंग करायला ते काही कपडे नाहीत. ती माझी बायको आहे आणि माझी बायको या नात्याने सायली माझ्यासोबत रियुनियन सोहळ्याला नक्की येणार, मी सायलीला माझ्यासोबतच घेऊन जाणार’, असं म्हणून अर्जुन अस्मिताला तिथेच गप्प करणार आहे. तर, अर्जुन आपल्याला बायको म्हणतोय, सगळ्यांसमोर आपल्यावर प्रेम व्यक्त करतोय, हे पाहून सायली आनंदून जाणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या येत्या भागांमध्ये सायली आणि अर्जुन यांचा हा लव्ह ट्रॅक पाहायला मिळणार आहे.
नुकतीच या मालिकेत एक नव्या पाहुण्या पात्राची एन्ट्री झाली होती. अर्जुनची मैत्रीण त्याला भेटायला सुभेदारांच्या घरी आली होती. तिला बघून सायलीचा मात्र जळफळाट झाला होता. मैत्रिणीची आणि अर्जुनची जवळीक पाहून सायलीला खूप राग येत होता. अर्जुनच्या मैत्रिणीला पाहून आपणही तिच्यासारखं व्हावं, असं वाटत होतं. त्यामुळे सायलीने देखील वन पीस ड्रेस घातला होता. मात्र, तिला त्यात चालताही येत नव्हतं. त्यावेळेस तुम्ही आहात तशाच छान दिसता, असं म्हणत अर्जुनने तिची समजूत घातली होती.
संबंधित बातम्या