Tharala Tar Mag 14th March 2024 Serial Update: 'ठरलं तर मग' या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना एकदा धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. प्रताप सुभेदार यांना अडकवण्याचे काम महिपतनीच केला आहे, हे सायली आणि अर्जुनला आधीपासूनच माहीत होते. मात्र, महिपत विरोधात ठोस पुरावे मिळावेत, म्हणून सायली आणि अर्जुन प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा मागोवा घेत असताना अर्जुनला संतोषबद्दल कळले. संतोष हा प्रताप सुभेदार यांच्या औषध कंपनीत कामाला आहे. प्रताप सुभेदारांच्या औषध कंपनीच्या ट्रकमध्ये जेव्हा ड्रग्ज सापडले, त्यावेळी संतोष कामावर होता. संतोषला अर्जुनने महिपतच्या घरातून बाहेर पडताना पाहिले होते. संतोष प्रताप सुभेदारांच्या कंपनीत काम करतो, तर तो महिपतच्या घरी काय करतोय, असा प्रश्न अर्जुनला देखील पडला होता.
प्रताप सुभेदारांच्या गाडीत ड्रग्ज ठेवण्याचे काम करण्यासाठी महिपतने संतोषलाच हाताशी धरल्याचे अर्जुनच्या लक्षात आले. संतोषने खरं बोलावं आणि महिपतचा गुन्हा उघड करावा, यासाठी अर्जुन आणि सायली प्रयत्न करत होते. मात्र, संतोषने सगळ्याच गोष्टींना नकार दिला. आपण महिपतला ओळखत नाही आणि ड्रग्ज प्रकरणात आपला काहीच हात नाही, असं म्हणत संतोषने यातून काढता पाय घेतला होता. तर, संतापलेल्या अर्जुन संतोषला धमकावून त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविराजने मध्ये पडत उलट अर्जुनलाच धमकावले. एका निर्दोष व्यक्तीवर खोटे आरोप लावून, त्याला मारहाण करून तू त्याच्याकडून स्वतःला हवी असलेली गोष्ट बदलून घेतोयस, अशी केस तुझ्यावर करेन असं म्हणून रविराजने अर्जुनला रोखलं.
काही झालं तरी संतोष खरं बोलायला कबूल होत नाही, यामुळे आता सायली आणि अर्जुन कोंडीत सापडले होते. मात्र, सायलीने संतोषच्या मुलीचे प्राण वाचवले आणि याच उपकारांची परतफेड म्हणून आता संतोष सायलीला सगळे पुरावे आणून देणार आहे. संतोषच्या मुलीला रस्त्यावर चक्कर येऊन पडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. तिला वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे तिचा जीव वाचवणे डॉक्टरांना शक्य झाले. संतोषच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी ही व्यक्ती म्हणजे सायली होती.
'तुमची मुलगी थोड्या वेळासाठी तुमच्यापासून दुरावली तर तुम्हाला किती त्रास झाला, तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही बाबांच्या गाडीमध्ये ड्रग्ज ठेवून त्यांना तुरुंगाची हवा खायला लावली, तेव्हा अर्जुन सरांना किती त्रास झाला असेल?', असा प्रश्न सायलीने संतोषला केला. सायलीचा हा भावनिक प्रश्न ऐकून संतोषच्या मनाला देखील पाझर फुटला. आता महिपत विरोधातील सगळे पुरावे संतोष सायलीकडे आणून देणार आहे. मात्र, याचवेळी साक्षी शिखरे सायली आणि संतोष बघणार आहे.
संबंधित बातम्या