‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब प्रतिमाच्या मृत्यूच्या दुःखात बुडून गेलेले दिसणार आहेत. पूर्णा आजीला सांभाळण्यासाठी सायली आणि अर्जुन किल्लेदारांच्या घरी थांबणार आहेत. यावेळी सगळ्यांसाठी खायला बनवण्यासाठी सायली किल्लेदारांच्या स्वयंपाक घरात जाणार आहे. या स्वयंपाकघरात आल्यावर सायलीला तिच्या पूर्वाआयुष्याबद्दल काही भास होणार आहेत. यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागणार आहे. सायलीची तब्येत खराब होतेय, हे पाहून अर्जुन चौकशी करणार आहे. आपण याआधीही कधीतरी इथे येऊन गेलो, असं मला सतत वाटतंय आणि त्यामुळेच अस्वस्थ होत आहे, असं सायली अर्जुनला सांगणार आहे. तर सायलीच्या या बोलण्यावर हसत अर्जुन देखील म्हणणार आहे की, आपण आजपर्यंत कितीतरी वेळा या घरात आलोय त्यामुळेच हे होत असेल.
यावर सायली म्हणते की, ‘मी या घरात आजवर बऱ्याचदा आले. मात्र मी या स्वयंपाक घरात या आधी कधीच आले नाहीये. पहिल्यांदाच मी या घराच्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवत आहे. तरीही मला इथं खूप वर्ष राहिल्याचा भास होतोय. मात्र, दोघेही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि इतरांची काळजी घेण्यासाठी निघून जातात. प्रतिमाच्या निधनाच्या दुःखात रविराज आणि पूर्णा आजी काहीही खायला तयार नसतात. तर, दुसरीकडे तन्वी उगाचच प्रतिमाच्या फोटोपाशी बसून रडण्याचं नाटक करत असते.
त्यावेळी अस्मिता खोट्या तन्वीला म्हणजेच प्रियाला म्हणते की, ‘तुझ्यापेक्षा जास्त सायलीच प्रतिमासारखी वागत आहे. तुझ्यात प्रतिमाचा एकही गुण नाही. यामुळे लक्षात येईल की, तू खरी तन्वी नाहीयेस.’ यावर चाचरत खोटी तन्वी म्हणजेच प्रिया अस्मिताला म्हणते की, सायली सगळी नाटकं करत आहे. आता सायली स्वतः रविराजला दोन घास तरी खाऊन घ्या, असं म्हणून खाण्याचा आग्रह करणार आहे. तर, अर्जुन पूर्णा आजीकडे जाऊन तिला जेवणाचा आग्रह करणार आहे.
सगळे असे उपाशी राहिले आणि सगळ्यांची तब्येत खराब झाली, तर प्रतिमाला कसं वाटेल? असं म्हणून तो आजीची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रतिमाचं नाव घेतल्यावर पूर्णा आजी रविराजला देखील म्हणणार आहे की, चल आपल्या प्रतिमासाठी आपण दोन घास खाऊन घेऊया. यानंतर सगळेच जेवून घेणार आहेत. काही कामानिमित्त सायलीवर गेल्यावर तिला प्रियाचा आवाज ऐकू येणार आहे. प्रिया फोनवर कुणाशी तरी खोटे रिपोर्ट बदलले त्याचे पैसे देण्याबद्दल बोलताना सायली ऐकणार आहे. आता प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकल्यावर सायलीला देखील धक्का बसणार आहे. आता सायली सगळ्यांसमोर प्रियाला यावर जाब विचारणार आहे.