Tharala Tar Mag 12 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अतिशय रंजक वळण येणार आहे. या मालिकेत आता सायली आणि अर्जुन यांच्यातील वाद मिटताना दिसणार आहेत. तर, प्रतिमाला घरात आपलसं वाटू लागणार आहे. तर, आता रविराज आणि अर्जुन प्रतिमाची खोटी डेडबॉडी देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास सुरू करणार आहेत. या मालिकेच्या येत्या आठवड्यात निर्णायक वळणं पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात देखील रंजक वळण पाहायला मिळणार आहे.
प्रियासोबत कॉफी पिताना दिसल्यामुळे सायली अर्जुनवर चांगलीच चिडली होती. यावरून दोघांमध्ये भांडण देखील झाले होते. सायली अर्जुनवर चिडल्यानंतर अर्जुनचा ताबा देखील सुटला आणि त्याने सायलीला बडबड केली. त्यामुळे सायलीला मनातून खूपच वाईट वाटलं. तर, रागावलेला अर्जुन देखील मी तुमची समजूत काढणार नाही, असं म्हणून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी कल्पना आणि अस्मिता या दोघींनाही सायली आणि अर्जुनमधली ही धुसफूस कळली. इतक्यात तन्वी उशिराने नाश्त्यासाठी येते. तेव्हा कल्पनाने तिला उशिरा उठण्याचे कारण विचारले. तर, आईच्या आठवणीत आपल्याला रात्रभर झोपच लागत नव्हती, त्यामुळे उठायला उशीर झाला, असं प्रिया तिला म्हणते.
दुसरीकडे, रविराज आणि अर्जुनने प्रतिमाची खोटी डेड बॉडी देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपास करायला सुरुवात केली आहे. यामुळेच प्रिया म्हणजेच खोटी तन्वी आणि नागराजचे धाबे दणाणले आहेत. रविराज आणि अर्जुनने सत्य शोधून काढलं, तर आपलं पितळ उघडं पडणार आणि आपल्याला शिक्षा होणार, ही गोष्ट दोघांनाही चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे दोघेही खूप घाबरून गेले आहेत. प्रिया हे सगळ्या गोष्टी कशा निस्तारायच्या याच विचारत रात्रभर असल्यामुळे तिला झोप लागली नव्हती. तर, सकाळी देखील उठल्या उठल्या ती पहिला नागराजला फोन करून रविराज त्या हॉस्पिटलमध्ये जात असल्याचं सांगणार आहे.
डीएनए रिपोर्ट बदलणाऱ्या नर्सला रविराज समोर येऊ नकोस, असं ती नागराजला सांगणार आहे. नागराज देखील हॉस्पिटलमध्ये धावत पोहोचणार आहे. मात्र, त्याचवेळी त्याला रविराज त्याच रिपोर्ट बदलणाऱ्या नर्स बरोबर बोलताना दिसणार आहे. हे बघून आता नागराजच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. दुसरीकडे प्रतिमा आत्याला बरं वाटावं म्हणून सायलीने एक नवी शक्कल लढवली आहे. सायली घरात चिवडा आणि लाडूचा बेत करणार आहे. तर, सायलीचे बोलणं ऐकून प्रतिमाला देखील किचनमध्ये जावसं वाटणार आहे. इतकच काय, तर प्रतिमा आता किचनमध्ये जाऊन आपल्या हाताने बेसनाचे लाडू वळताना दिसणार आहे. प्रतिमाला जर या घरात मोकळं वातावरण द्यायचं असेल, तर किचन शिवाय दुसरी चांगली जागा नाही, ही गोष्ट लक्षात येणार आहे.