‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली एका नवीन अवतारात पाहायला मिळणार आहे. अर्जुनची एक मैत्रीण त्याला भेटण्याच्या निमित्ताने सुभेदारांच्या घरात आली आहे. अर्जुनच्या कॉलेज मैत्रीण, तिचा रुबाब पाहून आता सायलीला देखील जेलसी होत आहे. अर्जुनची ही कॉलेजमधली मैत्रीण अतिशय मॉर्डन आणि स्टायलिश आहे. दोघांमधली ही इतकी जवळीक पाहून आता सायलीला बायको म्हणून अर्जुनचा राग येत आहे. तिचा हा राग म्हणजे तिला अर्जुन विषयी वाटणारं प्रेमच आहे. दुसरीकडे ही अर्जुनची मैत्रीण देखील स्वतः त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांचीही थट्टा मस्करी, धमाल पाहून आता सायलीला मात्र दोघांचाही राग येतोय.
आपण अर्जुनच्या मैत्रिणीसारखे दिसत नाही, म्हणून आपलं आणि अर्जुनचं मैत्रीचं नातं इतकं घट्ट नाही, असं सायलीला वाटत आहे. तर, अर्जुनची मैत्रीण आणि अर्जुन यांच्यामधील बोलणं आता सायलीच्या कानावर पडणार आहे. अर्जुनची मैत्रीण त्याला सांगत असते की, ‘कॉलेजमध्ये असताना तू सतत माझ्या मागे फिरायचास, मग लग्न करताना माझ्यासारखी एखादी हॉट मॉडर्न मुलगी का नाही शोधलीस बायको म्हणून? तू असे का साध्या गोळ्या मुलीशी का लग्न केलं?’, असा प्रश्न ती अर्जुनला विचारणार आहे. हे ऐकून दारामागे उभ्या असलेल्या सायलीच्या डोळ्यात पाणी येणार आहे. भलतीच मुलगी येऊन आपल्या नवऱ्याशी इतकं हसून खेळून बोलते हे पाहून सायलीला मनातून खूप त्रास होत आहे.
आता इतकं वाईट वाटल्यानंतर सायलीने मनाशी एक निर्णय पक्का केला आहे. सायली अर्जुनला आता सरप्राईज देण्याचं ठरवणार आहे. आजच्या भागात अर्जुन त्यांच्या रूममध्ये येऊन सायलीला आवाज देऊन तिला शोधायचा प्रयत्न करतो. त्यावेळी दाराच्या आड उभी राहून सायली ‘मी इकडे आहे’, असं म्हणत अडकत आणि धडपडत अर्जुन समोर येऊन उभी राहणार आहे. काळ्या रंगाचा शॉर्ट मिनी ड्रेस, पायात हिल्स आणि मोकळे केस या लूकमध्ये सायली सुंदर दिसत असली, तरी यामुळे तिला उभे राहणे देखील शक्य होत नाहीये. अर्जुनची मैत्रीण इतक्या उंच हिल्स घालून त्याच्या मागे कशी धावते, हे आपणही करू शकतो म्हणून सायलीने हा सगळा उपद्व्याप केला होता.
मात्र, सायलीला नीट चालता काय, उभेही राहता येत नव्हतं, हे पाहून अर्जुन स्वतःचं हसू आवरू शकला नाही. अर्जुन आपल्यावर हसतोय हे बघून सायलीला मात्र रडू कोसळलं. तर, अर्जुन सायलीची समजूत काढत तिला म्हणाला की, ‘मिसेस सायली तुम्ही जशा आहात तशाच खूप सुंदर आहात. अगदी कुणीही व्यक्ती तुमच्या प्रेमात सहज पडू शकतो’. अर्जुनच्या तोंडून हे ऐकून सायली मनोमन सुखावून गेली आहे. अर्जुनचं हे बोलणं पूर्ण होणार इतक्यात त्याला एक फोन येतो. आता हा फोन घेण्यासाठी अर्जुन दाराशी जात असताना सायली त्याला विचारणार आहे की, ‘तुम्ही पण माझ्या प्रेमात पडू शकता का?’ दोघांमध्ये येईल हा संवाद आता अतिशय रोमँटिक होणार असून, प्रेक्षकांना मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये दोघांमधील रोमान्स बघायला मिळणार हे नक्की आहे.