‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन आता एकमेकांच्या जवळ येताना पाहायला मिळत आहेत. नुकताच अर्जुनने सायलीचा जीव वाचवून तिच्या मनात स्वतःची जागा मिळवली आहे. तर, अर्जुन आधीच सायलीच्या प्रेमात पडला आहे. मात्र, हे सायलीला माहित नाही. दुसरीकडे, अर्जुनने घेतलेले ते कष्ट आणि तिची त्याला वाटणारी काळजी, हे जाणवल्यानंतर आता सायली देखील त्याच्या प्रेमात पडू लागली आहे. दोघेही एकमेकांजवळ प्रेमाचा स्वीकार करणार आणि प्रेमाची कबुली देणार इतक्यात आता त्या दोघांमध्ये एका नवीन व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक नवीन पात्राची एन्ट्री झाली असून, या पात्रामुळे सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात चांगलंच वादळ येणार आहे. अभिनेत्री रुचिरा जाधव हिने या मालिकेत एंट्री घेतली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारत असताना अर्जुन सगळ्यांनाच थांबवून एका व्यक्तीची वाट बघण्यास सांगतो. ही व्यक्ती आपली खूप खास असल्याचा देखील तो सगळ्यांना सांगतो. त्यामुळे अर्जुनची एवढ्या जवळची खास व्यक्ती कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती.
इतकं बोलत असतानाच अर्जुनच्या घराच्या गेट जवळ एक गाडी थांबते आणि त्यातून एक सुंदर तरुणी बाहेर येते. ही मुलगी अर्जुनची जवळची मैत्रीण आहे. मात्र, अर्जुन या मुलीला मिठी मारतोय हे बघून सायलीचा चांगला जळफळाट झाला. या मुलीची स्टाईल पाहून सायलीला देखील आपण तिच्यासारखं का नाही? असा प्रश्न पडला होता. या मुलीचं अर्जुनशी असणारं जवळचं नातं आता कुठेतरी सायलीला बायको म्हणून खटकू लागलं आहे. एकीकडे सायली अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना, ही कोण कुठली मुलगी आता पुन्हा दोघांच्या नात्यांमध्ये येऊन काय गोंधळ घालणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
मात्र, या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आल्याने आता चांगलीच धमाल पाहायला मिळणार आहे. अर्जुनला मिळवण्यासाठी आणि अर्जुन जवळ आपलं मन व्यक्त करण्यासाठी आता सायली देखील संधीची वाट बघत आहे. दुसरीकडे, अर्जुन आपल्या मनातील भावना सायलीला कशा सांगाव्यात, या विचारात पडला आहे. लवकरच दोघे एकमेकांवरचे प्रेम जाहीर करणार आहेत. या मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.