‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात साक्षी आणि चैतन्य यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू असलेली पाहायला मिळतेय. चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्यासाठी सुभेदार कुटुंब देखील साक्षीच्या घरी पोहोचलं आहे. मात्र, सुभेदार कुटुंब या ठिकाणी का आलंय याची कल्पना साक्षी आणि चैतन्याला नाही. अर्जुन आणि सायलीने आधीच विश्वासात घेऊन सगळ्यांना आपल्या प्लॅनबद्दल सांगितलं आहे. चैतन्यला वाचवण्यासाठी साक्षीच्या घरातून पुरावे शोधावेच लागतील, तरच त्याचा विश्वास बसेल, असं म्हणत त्यांनी तयार केलेला प्लॅन सगळ्यांना सांगितला आहे. आता सायली आणि अर्जुनच्या प्लॅननुसार पूर्णा आजी सगळ्यांना घेऊन साक्षीच्या घरी पोहोचली आहे.
साखरपुड्यासाठी पोहोचलेले सुभेदार कुटुंब साक्षीशी फारच प्रेमाने बोलत आहे, यामुळे आता अस्मिताला संशय येऊ लागला आहे. इतका वेळ साक्षीबद्दलचा राग मनात असताना, आता हे लोक साक्षीसोबत गोड कसे काय बोलू शकतात? यात नक्की काहीतरी कट असेल, हे लक्षात आल्यानंतर अस्मिता साक्षीला सांगायला जाणार इतक्यात सगळेच तिला अडवतात आणि वेगवेगळ्याविषय काढून तिला बोलण्यात गुंतवून ठेवतात. दुसरीकडे साक्षी आणि चैतन्य यांचं लक्ष त्यांच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीकडे जाऊ नये, म्हणून देखील सगळे प्रयत्न करत आहेत.
सायली आणि अर्जुन यांच्या प्लॅननुसार साक्षीने केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे तिने नक्कीच तिच्या रूममध्ये लपवून ठेवलेले असणार, याची त्यांना खात्री वाटत आहे. हे पुरावे शोधून काढण्यासाठीच अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरी आले आहेत. आता सगळे साखरपुड्याच्या कामात व्यस्त असताना सायली हळूच साक्षीच्या रूममध्ये शिरणार आहे. हे सगळं सुरू असताना सायली कुठेच दिसत नाहीये, हे साक्षीच्या लक्षात आल्यानंतर ती चांगलीच घाबरणार आहे. सायली कुठे आहे? असं ती सगळ्यांना विचारते. तेव्हा, सायली ही तुमच्यासाठी गिफ्ट आणायला गेली आहे, असं म्हणून सगळेच तिला थातूरमातूर उत्तर देऊ लागतात. मात्र, साक्षीचा यावर विश्वास नाही. त्यासाठीच आता ती आपल्या वरच्या रूममध्ये जाऊन सायली तिथे आहे की, नाही हे चेक करणार आहे.
आपला मेकअप ठीक करायचा आहे, तसेच फोन चार्जिंगला लावायचा आहे, असं म्हणून साक्षी तिच्या रूममध्ये पोहोचणार आहे. मात्र, साक्षी खालून वर जायला निघताच अर्जुनने सावध केल्यामुळे सायली आधीच लपली होती. रूम उघडल्यानंतर सायली तिथे न दिसल्याने साक्षीने सुटकेचा निश्वास टाकला. यानंतर खाली येऊन त्यांच्या साखरपुडा समारंभाला सुरुवात झाली. साक्षी खोली बाहेर निघून गेल्यानंतर सायलीने पुन्हा एकदा तिच्या रूममध्ये शोधाशोध सुरू केली. मात्र, काहीच पुरावे हाती लागत नसल्याने सायली देखील वैतागली होती. ती बाहेर निघणारी इतक्यात तिच्यासमोर फोल्डर खाली पडला आणि या फोल्डरमध्ये साक्षी आणि कुणालचे सगळे फोटो, त्यांची प्रेम पत्र, ग्रीटिंग्स सगळं काही व्यवस्थित जपून ठेवलेलं होतं. आता हे पुराव्यांचं घबाड सायलीच्या हाती लागलं आहे. मात्र, हा सगळ्यांमध्ये काहीतरी नक्कीच वेगळा डाव आहे, हे साक्षीच्या देखील लक्षात आलं आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार, हे बघणं रंजक असणार आहे.
संबंधित बातम्या