Tharala Tar Mag 1 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रिया अर्जुन आणि सायलीच्या घरात म्हणजेच सुभेदारांच्या घरात येऊन नवा तमाशा करण्याच्या प्रयत्नात असताना आता पूर्णा आजीने तिला चांगलाच इंगा दाखवला आहे. प्रिया सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या कराराची फाईल घेऊन सुभेदारांच्या घरात भर मध्यरात्री आली होती. यावेळी पूर्णा आजीने तिच्याच कानशिलात ठेवून दिली होती. मात्र, हे नक्की काय झालं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. यावेळी प्रिया ओरडून सगळ्यांना सत्य सांगत असली, तरी कुणीही तिच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. याही वेळी पूर्णाआजीने तिच्या हातून फाईल काढून घेऊन तपासली. तर, ती फाईल एका वेगळ्याच कामाची असल्याचे लक्षात आले.
प्रियाकडे असलेली फाईल ही बदलण्यात आली आहे. त्यामुळेच पूर्णा आजीचा संताप आणखीनच वाढला. तिने सायली आणि अर्जुन यांना बोल सुनावण्याऐवजी प्रियाच्याच थोबाडीत मारली. मात्र, हे कसं झालं हे अजून प्रियाच्याही लक्षात आलेलं नाही. प्रियाने सायली आणि अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ऑफिसमधून बरोबर चोरली होती. मात्र, ही फाईल अचानक कशी काय बदलली हा प्रश्न तिला देखील पडला होता. प्रिया ऑफिसमधून चोरून बाहेर पडत असताना अर्जुनने तिला पाहिलं होत. यानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल गायब झाल्याचे कळताच सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला.
यावेळी सायली आणि अर्जुन यांनी मिळून एक प्लॅन केला. त्यांनी वेश बदलून प्रियाची गाडी अडवली. वेश बदलून गेलेला अर्जुन प्रियाशी बोलत असताना, सायलीने हळूच गाडीतून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन त्या जागी दुसरी फाईल ठेवली. मात्र, ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आली नाही आणि ती तीच फाईल घेऊन सुभेदारांच्या घरी पोहोचली होती. मात्र, पूर्णा आजींनी फाईल हातात घेताच, त्या फाईलमध्ये काहीही नसल्याचं सगळ्यांच्याच लक्षात आलं. त्यामुळे पुन्हा एकदा प्रिया खोटं बोलतेय, असं सगळ्यांना वाटू लागलं.
या आधीही प्रियाने सायली आणि अर्जुन यांचे लग्न मोडण्यासाठी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी ही सायलीने देवाच्या पुढे उभी राहून शपथ घेतल्यामुळे सगळ्यांनी सायलीवर विश्वास ठेवला होता. आता देखील प्रिया एक खोटी फाईल घेऊन सायली आणि अर्जुन छान नात्यावर प्रश्नचिन्ह लावतेय, हे लक्षात आलं म्हणून पूर्णा आजी प्रचंड संतापतात. त्यांनी अर्जुन-सायलीऐवजी प्रियाच्या कानाखाली मारली आणि तिला घरातून बाहेर काढलं. इतकंच नाही, तर यापुढे सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवायचं नाही, अशी तंबी देखील दिली. मात्र, यानंतर आता अर्जुन आणि सायली देखील भांबावून गेले आहेत. आपल्या नात्याचं सत्य आपणच आपल्या कुटुंबाला सांगायचं, असं त्यांनी ठरवलं आहे.
संबंधित बातम्या