Tharala Tar Mag 1 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आजच्या भागात सायली प्रतिमा आत्याची काळजी घेताना दिसणार आहे. प्रतिमा आत्यामुळे आता खोट्या तन्वीचा म्हणजेच प्रियाचा सुभेदारांच्या घरात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रतिमा आत्याचा बहाणा करून आता प्रिया सुभेदारांच्या घरात राहण्याचा हट्ट करणार आहे. तर, मुलीच्या निमित्ताने तरी आईच्या आठवणी परत येतील, असा विचार करून सुभेदार कुटुंबातील लोक देखील प्रियाला घरात ठेवून घ्यायला तयार झाले आहेत.
प्रियाच्या असण्याने प्रतिमा या धक्क्यातून सावरेल आणि तिला तिचा भूतकाळ आठवेल, असे सगळ्यांनाच वाटत आहे. मात्र, सुभेदारांच्या घरात राहण्याचा प्रियाचा मनसुबा काहीतरी वेगळाच आहे. प्रियाला अर्जुनच्या आणखी जवळ येण्याची संधी मिळणार आहे. सुभेदारांच्या घरात राहत असल्यामुळे आता ती अर्जुनच्या खोलीत कधीही जाऊ आणि येऊ शकते. या गोष्टीचं आता अर्जुनला टेंशन आलं आहे. अर्जुन प्रियाकडून खरं काढून घेण्यासाठी तिच्यासोबत मैत्री करण्याचं आणि प्रेमाचं खोटं नाटक करत आहे. मात्र, प्रिया या सगळ्याला खरं समजत आहे. आता प्रियाने आपल्याशी मैत्री करण्याचा आणि आणखी जवळ येण्याचा विचार करून आपल्या खोलीत सतत येण्याचा प्रयत्न केला, तर आपलं पितळ उघडं पडेल आणि सगळा डाव फसेल, याची भीती अर्जुनला वाटत आहे.
दुसरीकडे, प्रिया सतत लगट करण्याचा प्रयत्न करतेय, यामुळे सायली अर्जुनवरच चिडत आहे. आता प्रियाला रूममध्ये आलेलं पाहून सायली आणखी चिडेल, हे अर्जुनच्या लक्षात आलं आहे. प्रिया अर्जुनच्या रूममध्ये जाऊन त्याला, ‘मला माझ्या आईच्या जवळ राहायचं आहे. तिचं प्रेम पुन्हा एकदा अनुभवायचं आहे’, असं म्हणत इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुनला प्रियाचं खरं रूप चांगलंच माहित आहे. त्यामुळे तो प्रियाकडे कानाडोळा करताना दिसतोय.
मात्र, प्रिया आपल्या रूममध्ये आहे, हे बघून सायली चिडणार हे त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो आता हळूच दारातून बाहेर वाकून पाहणार आहे. तर, किचनमधून प्रतिमा आत्यासाठी पाणी घेऊन जाणारी सायली अर्जुनच्या रूमच्या लाईट अजून कशा काय चालू, हे बघण्यासाठी आता त्याच्या रूममध्ये जाणार आहे. मात्र, त्याचवेळी अर्जुनने बाहेर वाकून बघितल्यामुळे त्याला वर येणारी सायली दिसणार आहे. आता अर्जुन प्रियाला त्याच्या खोलीतून बाहेर काढू शकेल का आणि यावर प्रियाची प्रतिक्रिया काय असेल? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या