मनोरंजन विश्वात पदार्पण करणे आणि आपली स्वप्ने पूर्ण करणे ही गोष्ट प्रत्येकाच्याच आवाक्यात नसते. काही वेळा जेव्हा पालक तुमच्या स्वप्नांच्या विरोधात असतात, तेव्हा तर स्वतःचा मार्ग निवडताना अनेक अडचणी येतात. असाच काहीसा प्रकार जोसेफ विजय चंद्रशेखर यांच्यासोबत घडला, जो आज साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये थलापती विजय या नावाने प्रसिद्ध झाला आहे. थलापती विजय आज (२२ जून) त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. २२ जून १९७४ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या विजयने वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या वडिलांचा या क्षेत्राला जोरदार विरोधात होता. थलापती विजयचे वडील एसए चंद्रशेखर हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. असे असूनही आपल्या मुलाने चित्रपटात करिअर करावे, अशी त्यांची इच्छा नव्हती. मात्र, वडिलांच्या या नकाराकडे दुर्लक्ष करून, विजयने इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि आज तो ज्या स्थानावर आहे, त्या स्थानावर पोहोचण्याचे स्वप्न लोक अनेकदा पाहतात.
थलापती विजयने वयाच्या १८व्या वर्षी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. १९९२मध्ये त्याचा पहिला चित्रपट 'नलाय थेरपू' रिलीज झाला होता. या चित्रपटातून विजय अभिनेता बनला असला, तरी हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. यानंतर विजयने सलग तीन चित्रपट केले आणि तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने केवळ साऊथमध्येच नाही, तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही काम केले आहे. या अभिनेत्याने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत काम केले आहे. याशिवाय त्याने प्रियांका चोप्रासोबतही काम केले आहे.
मनोरंजन विश्वात आल्यानंतर थलपथी विजयने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे हिंदी रिमेक बॉलिवूडमध्ये बनले आहेत. आज विजय साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, विजयने फीच्या बाबतीत सुपरस्टार रजनीकांतलाही मागे टाकले आहे. या अभिनेत्याने ६४हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तरुणींमध्ये सुरुवातीपासूनच विजयबद्दल मोठी क्रेझ होती.
थलापती विजयवर लाखो तरुणी फिदा होत्या. थलापती विजयने या चाहतींपैकी एकीलाच आपली जीवनसाथी बनवले आहे. पडद्यावर अभिनय करत असताना तो अनेक सुंदरींच्या प्रेमात पडला आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात त्याचे हृदय एका सामान्य मुलीवर जडले. ख्रिश्चन असणाऱ्या थलापती विजयने त्याची हिंदू फॅन संगीतासोबत लग्न केले आहे. आज दोघेही आनंदी जीवन जगत आहेत. या जोडीला दोन मुले आहेत.
संबंधित बातम्या