Thalapathy Vijay Against CAA: निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएची अधिसूचना सोमवारी संध्याकाळी जारी करण्यात आली. याच अधिसूचनेच्या आधारे हा कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, आता दक्षिण भारतातून सीएएला कडाडून विरोध होत असल्याचे दिसत असून, या कायद्याविरोधात लोक आवाज उठवू लागले आहेत. प्रसिद्ध साऊथ अभिनेता- राजकारणी थलापती विजय याने देखील सीएएला कडाडून विरोध केला आहे. इतकेच नाही तर, तर त्याने तामिळनाडू सरकारला पत्र लिहून आवाहन देखील केलं आहे.
थलापती विजय याने नागरिकत्व सुधारणा कायदा न स्वीकारण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी तामिळनाडू सरकारला सीएए मंजूर न करण्याचे आवाहनही केले आहे. सोमवारी संध्याकाळी सीएएशी संबंधित अधिसूचना जारी झाल्यानंतर, थलापती विजय याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अर्थात एक्सवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करताना त्याने लिहिले की, ‘भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएएसारखा कोणताही कायदा अशा लोकशाही असलेल्या देशात लागू केला जावा, हे कदापि मान्य केले जाणार नाही. या देशात सगळेच नागरिक सामाजिक सौहार्दाने राहतात.’
थलापती विजय याने तमिळनाडू सरकारला पत्र लिहून राज्यात सीएए लागू होऊ देऊ नये, अशी विनंतीही केली आहे. थलापती विजय यांनी या पत्रात लिहिले की, ‘कोणत्याही किंमतीत हा कायदा तामिळनाडूमध्ये लागू होणार नाही याची काळजी सर्व नेत्यांना घ्यावी लागेल.’
थलापती विजय व्यतिरिक्त अनेक विरोधी नेते CAA विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. सर्वांनी मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. अनेक विरोधी नेत्यांनी भाजपवर समाजात फूट पाडल्याचा आरोप केला आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजप फूट पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. थलापती विजयशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला आहे. स्टॅलिन यांनी सीएएला भाजपच्या 'विभाजनकारी अजेंड्या'चा भाग म्हटले आहे. लोक लवकरच त्यांना धडा शिकवतील, असे स्टॅलिन म्हणाले.
साऊथचा प्रसिद्ध अभिनेता थलापती विजयने यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला. गेल्या महिन्यात विजयने त्यांच्या 'तमिझगा वेत्री कळघम' या नव्या पक्षाची घोषणा केली होती. मात्र, विजय यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार, २०२६मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजय याचा पक्ष सक्रिय राजकारणात एन्ट्री करेल.