Telangana Assembly Elections 2023: देशांतील काही राज्यांमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तेलंगणात आज १९९ जागांवर मतदान होत आहे. यावेळी २२९० उमेदवार निवडणूक लढले आहेत. राज्यात सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. आता टॉलिवूड स्टार्सही मतदान करण्यासाठी मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी काळे कपडे परीधान करून, अनवाणी पायानेच चिरंजीवी मतदान केंद्रावर पोहोचले होते. अभिनेते चिरंजीवी अनवाणी पायाने आल्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं. मात्र, यामागे देखील एक खास कारण आहे.
साऊथ स्टार अभिनेता चिरंजीवी हे दरवर्षी स्वामी अय्यपाची पूजा करतात. यासाठी दरवर्षी पाळले जाणारे कडक व्रत देखील ते करतात. या व्रतासाठी ते ४१ दिवस काळे वस्त्र परिधान करून आणि अनवाणी फिरतात. यंदा अय्यपाची पूजा १६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे चिरंजीवी आज ज्युबिली हिल येथेील मतदान केंद्रावर अनवाणी पायानेच आले होते. केवळ अभिनेते चिरंजीवीच नाही तर, त्यांचा मुलगा अभिनेता राम चरण देखील अय्यप्पा स्वामींचा भक्त आहे. तो देखील या व्रताचे पालन करतो. यामुळेच अधूनमधून तो देखील काळ्या कपड्यांत आणि अनवाणी दिसतो.
अभिनेते चिरंजीवी यांचा भाऊ पवन कल्याण हा प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी आहे. पवन कल्याण आंध्र प्रदेशातीळ जनतेमध्ये तुफान लोकप्रिय आहे. त्याचा जनसेना नावाचा पक्ष देखील आहे. या पक्षाचे ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अभिनेता चिरंजीवीने देखील २००८ साली 'प्रजा राज्यम' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. २००९च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे १८ आमदार निवडून आले होते. मात्र, २०११ साली त्यांनी 'प्रजा राज्यम' पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन करण्याचा निर्णय घेतला. नंतर कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेले चिरंजीवी राज्यसभा खासदार आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री देखील झाले. मात्र, काही कालावधीनंतर चिरंजीवी यांनी राजकारणच सोडण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ते राजकारणापासून दूर असून, राजकारणाात परतण्याचा काही विचार नसल्याचं सांगतात.