गेल्या काही दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक बायोपिक येताना दिसत आहेत. या बायोपिकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर 'येक नंबर' या चित्रपटाच्या टीझरची चर्चा रंगली आहे. या टीझरमधील आवाज हा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तसेच हा टीझर कोणत्या राजकीय नेत्याचा बायोपिकतर नाही ना? अशा चर्चांना उधाण आले आहे. चला पाहूया काय आहे चित्रपटाचा टीझर?
'येक नंबर' चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा... महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक... जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज... उत्साह... दिसत आहे. तर दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळ, धुडगूस दिसत असून 'ठाकरे साहेब' असा हलकासा आवाजही कानावर येत आहे. हा टीझर पाहून पाहून प्रेक्षकांच्या मनात आता असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोस्टर झळकल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात लक्षवेधी ठरली, ती पोस्टरमधील करारी नजर आणि त्यात भर टाकली आहे ती पोस्टरमधील बुलंद आवाजाने. त्यामुळे हा बायोपिक आहे का, हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच प्रचंड उत्सुकता लागली आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती ही तेजस्वीनी पंडितने केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, 'येक नंबर' टीझरमध्ये धैर्य घोलपसह सायली पाटीलची झलकही दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटाच्या तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला निर्मात्या आहेत. 'येक नंबर'ला अजय-अतुल यांसारखे कमाल संगीतकार लाभले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.
वाचा: म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!
निर्माती तेजस्विनी पंडित म्हणतात, ''चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहाता चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. 'येक नंबर'ची कथा अतिशय कमाल असून ही कथाच या चित्रपटाचा नायक आहे. अशा प्रकारचा प्रयत्न मराठीत यापूर्वी कधीही झाल्याचे मला आठवत नाही."