मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्विटची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा, असं काय आहे त्यात?

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्विटची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा, असं काय आहे त्यात?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 07, 2024 06:11 PM IST

Tejaswini Pandit Tweet Viral: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असताना आता अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे नवे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Tejaswini Pandit Tweet Viral
Tejaswini Pandit Tweet Viral

Tejaswini Pandit Tweet Viral: मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या दमदार अभिनयासोबतच बिनधास्त बोलीमुळे देखील चर्चेत असते. राजकारण असो वा समाजकारण तेजस्विनी पंडित तिची मतं अगदी बेधडकपणे मांडत असते. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात एकीकडे सत्तानाट्य सुरू असताना आता अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे नवे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तेजस्विनी पंडित हिने अगदी मोजक्याच शब्दांत एक ट्वीट केले आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने नुकतेच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये तिने लिहिले की, ‘जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे!’ आता तेजस्विनी पंडित हिने हे ट्वीट नक्की कुणाला उद्देशून केले आहे, याचा चाहते वेगवेगळा कयास बांधत आहेत. मात्र, आता तिच्या ट्वीटची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. तिच्या या ट्वीटवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत. काहींनी तिच्या या ट्वीटचा अर्थ जाणून तिला पाठिंबा दिला आहे. तर, काहींनी तिच्या ट्वीटवर टीका देखील केली आहे. तेजस्विनी पंडित हिचं हे ट्वीट सध्याच्या राजकीय परिस्थितीला उद्देशून आहे.

Ashok Saraf: ‘प्रत्येक क्षणी त्यांचा अभिमान वाटतो’; अशोक सराफ यांच्यासाठी लेकाची खास पोस्ट!

काय म्हणतायत नेटकरी?

‘ताईंनी (येत नसलेला) अभिनय सोडून सरळ राजकारणात यावे. उगाच कशाला उंटावरून शेळ्या हाकायच्या? बरोबर ना’, असे एका व्यक्तीने कमेंट करत म्हटले आहे. तर, आणखी एकाने कमेंट करताना लिहिले की, ‘ताई हे सगळे ठीक आहे.. तुमच्या सहकलाकारांना मुलाखती मधे एक वाक्य मराठीमध्ये इंग्रजीच्या कुबड्या न घेता बोलून दाखवायला सांगा. प्रेक्षक सगळे ओळखतात.’ आणखी काहींनी अशाच कमेंट करत तिच्यावर टीका करण्याचा प्रयत्न कला आहे. ‘वाईट वाटलं तुमचा एवढा आत्मविश्वास बघून...आपण फक्त बोलण्यातच पुढे बाकी कुठंच नाही...’, ‘किती त्रास होतो ना... आपलंच औषध आपल्याला भेटलं की, जोपर्यंत स्वतः दुसऱ्याला देत होते, तेव्हा एक शब्द निघत नव्हता. आता तर पार जळफळाट होतोय, चालू द्या खूप सहन केला आधी लोकांनी... आता काही दिवस तुम्ही पण करा.’

तर, काहींनी तेजस्विनीच्या या ट्वीटला समर्थन देत म्हटले की, ‘तुझा अभिमान वाटतो..इतकं महाशक्तीचा दबाव, ईडी, सीबीआय, आयटीसारख्या संस्थांचा वापर, वैयक्तिक अश्लील भाषेचा वापर करून देखील आपण लोकशाहीसाठी व अन्यायाविरुद्ध बोलत आहात खरंच गर्व आहे तुमच्यावर.’ आता यावर तेजस्विनी काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp channel