महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४चा निकाल हा २३ नोव्हेंबर रोजी जाहिर झाला. या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या महायुतीने म्हणजेच भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने २३४ जागांवर विजय मिळवला. अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या. तर दुसरीकडे मनसे मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली आहे. या निवडणुकीत मनसेला खातेही खोलता आले नाही. दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
माहिम या मतदार संघातून राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. अमित ठाकरेसोबतच माहिममध्ये शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) गटाच्या महेश सावंत उभे होते. शिवाय भाजपच्या सदा सरवणकरदेखील या लढतीत होते. ही तिहेरी लढत चांगलीच चर्चेत होती. अनेकांना मनसेमधून अमित ठाकरेंचा विजय होईल असे वाटत होते. पण अखेर महेश सावंत यांनी बाजी मारली. एकूणच या निवडणुकीतही राज ठाकरेंच्या नशिबी निराशाच आली. यंदाच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंना मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही पाठींबा दिला होता. मनसे आणि राज ठाकरे यांना जाहीर पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजस्विनी पंडित.
तेजस्विनीने तिच्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत राज ठाकरेंना पाठींबा दिल्याचे पाहायला मिळाले. तेजस्विनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला राज ठाकरेंसाठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने “विजयी उमेदवारांचं अभिनंदन! कोण? कसं? आणि काहीजण का नाही? हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला १००/१००. पण तरीही… राजसाहेब ठाकरे” असं म्हटलं आहे. तसंच एकनिष्ठ व सदैवसोबत हे हॅशटॅग देत तिने “आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...
विधानसभा निवडणुकीत यंदा मनसेला मोठे अपयश मिळाले आहे. त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर “अविश्वसनीय! तूर्तास एवढेच…”, अशी पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. त्या पाठोपाठ आता तेजस्विनी पंडितची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.