महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ पाहून तेजस्वीनी पंडितने शेअर केला 'तो' व्हिडीओ
तेजस्वीनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर टांगती तलवार आहे. शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहाटीला पोहोचल्याने सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आणखी बळावली आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील उलथापालथ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
तेजस्वीनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'रानबाजार' या सीरिजमधील एक प्रसंग शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मकरंद अनासपुरे बोलताना दिसत आहे की, “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत. पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा.”
पुढे व्हिडीओमध्ये एक वृत्तनिवेदिका बोलते की, “महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसूफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाराष्ट्रात अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळले. महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ’, ‘सरकार संकटात’, ‘मोठा रानबाजार सुरू आहे.”
तेजस्वीनीने हा व्हिडीओ शेअर करत 'काय मग बघताय ना रानबाजार?' असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने “मला तरी असं वाटतं रानबाजार आणि सध्या सुरु असलेल्या राजकारणामध्ये फारसं अंतर नाही” असे म्हटले आहे.