आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तिने मराठीसह बॉलीवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेजस्विनी तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे बोलताना दिसते. नुकताच तिने मराठमोळ्या अभिनेत्रींना ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.
तेजस्विनीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घातल्यावर किंवा बिकिनीमधील फोटो शेअर केल्यामुळे त्यांना अनेकदा मराठी अस्मितेवरून ट्रोल केले जाते. यावर तुझे मत काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तेजस्विनीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
वाचा: 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झालेली जिग्ना वोरा आहे तरी कोण?
“सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवर आता पैसे आकारले पाहिजेत असे मला वाटते. प्रत्येक कमेंटसाठी कमीत कमी दहा रुपये जरी आकारले तरीही, लोक असले प्रकार करणार नाहीत आणि कमेंट्सचे एकंदरीत स्वरुप बदलेल. जर माझे शरीर चांगले आहे… मला एखादे कपडे आवडतात आणि ते मी घातले यात काहीच गैर नाहीये. बरे स्विमिंग पूलमध्ये बिकिनी नाही घालणार, तर कुठे घालणार? त्यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचे? की, लोकांना काय वाटते म्हणून जगायचे हे तुमचे तुम्हाला ठरवावे लागेल” असे तेजस्विनी म्हणाली.
पुढे ती म्हणाली की, “स्वत:च्या मताप्रमाणे जगायचे ठरवले की, बिकिनी घालून फोटो टाकल्यावर खालच्या कमेंट्स वाचायच्या नाहीत. त्या फोटोंवरुन कोणी ट्रोल केले तरीही फरक पडता कामा नये. जर अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला जमत नसेल, तर लोकांना हवे तसे वागावे लागते. माझ्या अनेक मैत्रिणींनी मुले होऊ द्यायची नाहीत असा निर्णय घेतला आहे. यावर अनेक लोकांनी खूपच वाईट कमेंट्स केल्या होत्या. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणे ही सोशल मीडियावरची खूप मोठी समस्या आहे.”