गुनिजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) आयोजित गुनिजान बंदिश राष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात तेजस्वीनी वेर्णेकरने तर पुरुष गटात मेहेर परळीकरने प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या १००व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील तेजस्वीनी वेर्णेकर हिने महिलागटात विजय मिळवला. तर, पुण्याच्या मेहेर परळीकरने पुरुष गटात पहिले स्थान मिळवले. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी १,२५,००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेतील दुसऱ्या स्थानावर महिलागटात पश्चिम बंगालच्या परगणा येथील सोमदत्ता चॅटर्जी तर, तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमधील युगंधरा केचे यांनी बाजी मारली आहे. पुरुष गटात दर्शन मेलवंकी (विजापूर, कर्नाटक) द्वितीय, तर अथर्व वैरागकर (नाशिक, महाराष्ट्र) तृतीय स्थानी आले आहेत. द्वितीय स्थानाच्या विजेत्याला प्रत्येकी ७५,००० रुपये आणि तृतीय स्थानाच्या विजेत्याला ५०,००० रुपये रोख पारितोषिक मिळाले. स्पर्धेची उपउपांत्य, उपांत्य आणि अंतिम फेरी पुण्यातील डॉ. श्रीराम लागू रंगावकाश येथे आयोजित करण्यात आली होती. अंतिम फेरीत महिला गटात आद्या मुखर्जी, नंदिनी गायकवाड, स्वाती तिवारी, आणि पुरुष गटात इशान घोष, ऋषिकेश करमरकर यांचा समावेश होता.
स्पर्धेतील परीक्षक पंडित सुरेश तळवलकर यांनी स्पर्धेचे महत्त्व सांगताना म्हणाले की, ‘तालाचा छंद आणि रागाची धून यामध्ये बंदिशीची निर्मिती होते.’ त्यांनी स्पर्धकांना यशस्वी वाटचालीसाठी मूळ बंदिशीचे भान ठेवण्याचे आवाहन केले. पंडित सुहास व्यास यांनीही स्पर्धकांना पारंपरिक बंदिशी शिकण्याची आवश्यकता स्पष्ट केली. ते म्हणाले की, प्रत्येक बंदिश ही परंपरेतून आलेली असते आणि तिचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. स्पर्धेची संकल्पना प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांनी स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, ‘सांगीतिक विचारांची देवाण-घेवाण करणे आवश्यक आहे आणि पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशींचे मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे.’
स्पर्धेच्या निमित्ताने बंगळुरूच्या युवा गायक सिद्धार्थ बेलमन्नू यांचे शास्त्रीय गायन सादर करण्यात आले. त्यांना तबला वादनासाठी अजिंक्य जोशी आणि संवादिनीसाठी निलय साळवी यांनी साथ दिली. या स्पर्धेचे आयोजन पंडित सी. आर. व्यास यांना मानवंदना देण्याचे एक माध्यम आहे, असे ग्रेस फाऊंडेशनचे अध्यक्ष शशी व्यास यांनी सांगितले. स्पर्धेत सन्मानित विजेत्यांना ज्येष्ठ गायिका विदुषी निर्मला गोगटे, पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, आणि पंडित सुहास व्यास यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
संबंधित बातम्या