Lokshahi Movie On OTT: जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे. या खास दिवसाचं निमित्त साधत अभिनेत्री तेजश्री प्रधान आता तिच्या चाहत्यांना खास सरप्राईज देणार आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लोकशाही’ हा चित्रपट आता घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तिचा हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. महिला दिनाचं निमित्त साधून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लोकशाही’ हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे, ते जाणून घेऊया...
काही दिवसांपूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लोकशाही’ या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता. येत्या ८ मार्च २०२४ रोजी ‘लोकशाही’ हा चित्रपट अल्ट्रा झकास या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून, रसिक प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची मुख्य भूमिका असलेला ‘लोकशाही’ हा चित्रपट एका राजकीय कथानकावर आधारित आहे. हा चित्रपट एक पॉलिटीकल ड्रामा चित्रपट आहे. समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते, ही साखळी तिच्या वडिलांच्या हत्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे. मात्र, हत्या आणि हत्येमागचा कट कोणाचा आहे, याचा थरार जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागणार आहे. राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, आणि सत्तासंघर्ष ‘लोकशाही’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असून, अंकित मोहन, डॉ. गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे सुप्रसिद्ध कलाकार राजकारणाच्या भयाण खेळात धुरळा उडवण्यासाठी उतरले आहेत.
‘लोकशाही’ हा चित्रपट सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मित केला असून, संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सांभाळले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय-राजी या जोडीने केले असून, चित्रपटातील गाणी जयदीप बागवडकर आणि राजलक्ष्मी संजय यांनी गायली आहेत. संजय अमर आणि शाम मळेकर यांनी गीतं शब्दबद्ध केली आहेत.
संबंधित बातम्या