मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकार तेजश्री प्रधान आणि सुबोध एकत्र करणार असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या दोघांचा 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक वेगळी कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांची मने जिंकली आहेत. आता सर्वजण 'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अथश्री आणि गायत्री ही दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वं त्यांच्या लग्नासाठी एकमेकांना पहिल्यांदा भेटताना दिसत असून या दरम्यान काही गंमतीशीर घटना घडताना दिसत आहेत. दोघांचे विचार एकमेकांसोबत शेअर करत असतानाच त्यांच्या आयुष्यातील काही रहस्येही समोर येत आहेत. त्यामुळे यात धमाल तर आहेच तसेच काही ट्विस्टही अनुभवायला मिळणार आहेत. या सगळ्यातून अथश्री आणि गायत्री यांचे लग्न होणार का? हे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर कळेल.
या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल होते. 'लग्न'संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आले आहेत. आता ट्रेलर पाहून या चित्रपटाच्या दुसऱ्याही अनेक बाबी समोर आल्या आहेत. या सगळ्या गोष्टी असतानाच ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’च्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडीही पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. याव्यतिरिक्त यात प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही भूमिका आहेत. त्यामुळे एकंदरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करणार असल्याचे दिसतेय.आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.
वाचा: बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका
'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी ही एक वेगळी कथा असल्याचे सांगितले आहे. “आजच्या काळात लग्न करताना एकमेकांत बघितल्या जाणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. लग्न करताना आता तरुणांची विचारसरणी बदलली आहे, त्यांचा लग्नाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा झाला आहे. हा सिनेमा तरुणांना विशेष जवळचा वाटेल. असे असले तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. यात मजा, धमाल तर आहेच प्रसंगी प्रेक्षकांना हळवाही बनवेल. कथानकात सुबोध आणि तेजश्रीच्या जबरदस्त अभिनयाने अधिकच रंगत आणली आहे'' असे ते म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या